भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मांडलेला उच्छाद कमी होत असल्याचं चित्र आहे. दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांची संख्या १ लाखांच्या खाली आली असून मृत्युंचा आकडाही २ हजारांच्या खाली नोंदवला जात आहे. मात्र सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या किंचित अधिक आहे. त्याचप्रमाणं एकूण मृत्युंचा आकडाही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी थोडा वाढला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आकडेवारी वाढण्याचा सिलसिला दिसून येत आहे. त्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत. साधारणतः दर शनिवारी आणि रविवारी देशात होणाऱ्या कोरोना टेस्टचा आकडा कमी झाल्याचं दिसतं. शनिवार आणि रविवारी नागरिक टेस्ट करण्यासाठी कमी संख्येनं बाहेर पडत असल्याचं दिसतं. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी समोर येणारी आकडेवारी ही कमी असते.
सोमवारपासून सुरु होणाऱ्या नव्या आठवड्यात पुन्हा टेस्टचं प्रमाण वाढतं. त्याचे रिपोर्ट्स मंगळवारी नोंदवले जातात. त्यामुळेच मंगळवारच्या २४ तासांत नोंदवल्या जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही कायमच रविवार आणि सोमवारपेक्षा वाढलेली दिसते. मात्र ही सामान्य गोष्ट असून आकड्यांमध्ये किरकोळ फरक असल्यामुळे चिंता करण्याचं कुठलंही कारण नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. [read_also content=”मराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग? https://www.navarashtra.com/latest-news/prakash-ambedkar-will-participate-in-the-silent-movement-of-maratha-revolution-nrms-142751.html”]
भारतात गेल्या २४ तासांत ६३, ८६८ नव्या कोरोना केसेस आढळून आल्यात. सोमवारी हा आकडा ५९, ९१४ एवढा होता. तर मंगळवारी देशभरात १४५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सोमवारी नोंद झालेला आकडा १३२६ होता.