मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने टीका करणाऱ्या राहुल गांधी यांची साथ जर ठाकरे गटाने सोडली असती, आणि ‘सामना’च्या अग्रलेखातून तसे स्पष्टपणे मांडले असते, तर कदाचित कुणीतरी त्याचा विचार केला असता,” अशा शब्दांत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.
सामंत म्हणाले, “राहुल गांधी जगभर फिरून वाटेल त्या पद्धतीने सावरकरांवर टीका करतात. त्यांनी सावरकरांनी माफीनामा दिला आणि इंग्रजांसमोर शरणागती पत्करली, असा आरोप केला. अशा आरोपांना उत्तर देणे ‘सामना’ या मुखपत्रातून अपेक्षित होतं. पण तसे झाले नाही.”
ते पुढे म्हणाले, “ज्या लोकांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बसणं स्वीकारलं, त्यांना सावरकर यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सावरकरांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या नावाचा वापर करून भावनिक राजकारण केलं जातं, पण त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणाऱ्यांची साथसुद्धा स्वीकारली जाते. ही दुहेरी भूमिका योग्य नाही.”
BMC निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कौटुंबिक नाते असलेल्या महिला नेत्याने सोडली साथ
सामंतांनी अप्रत्यक्षपणे ‘सामना’तील संजय राऊत यांच्या अग्रलेखावर निशाणा साधत म्हटले की, “जर त्या अग्रलेखातून स्पष्ट भूमिका घेतली गेली असती आणि राहुल गांधींच्या विधानांचा निषेध केला असता, तर समाजात योग्य संदेश गेला असता. पण तसं न करता सावरकरांविषयी बोलणाऱ्यांच्या सोबतच बसण्यात काहींना कमीपणा वाटत नाही.”
दरम्यान,आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. विशेषतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांची राजकीय सक्रियता आणि एकनाथ शिंदे गटासह भाजप नेत्यांशी वाढत चाललेली जवळीक, यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी ही परिस्थिती तणावाची ठरू शकते.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबत दोन्ही नेत्यांनीही सुरुवातीला सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, अचानक ही चर्चा थांबवण्यात आली आणि राज ठाकरे यांची भाजप व शिंदे गटातील नेत्यांशी सुरू झालेली भेट-मुलाखत युतीच्या चर्चेला नवे वळण देऊ लागली.
राज ठाकरे पुन्हा सक्रिय, पण कोणाच्या बाजूने?
राज ठाकरे सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय मोडमध्ये असून, विविध पक्षांशी युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, ही युती भाजपसोबत होणार की अन्य कुणाशी – हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे भाजप-मनसे जवळ येण्याच्या शक्यतेला बळ मिळाले.