सातारा : जरंडेश्वर कारखान्याला मालमत्ता तारण म्हणून जे शंभर कोटींचे कर्ज देण्यात आले, त्या ठरावाच्या वेळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. कार्यवृत्तांत अहवालावर त्यांची स्वाक्षरी आहे. एकीकडे सह्या करायच्या आणि दुसरीकडे अपुऱ्या माहितीवर सभासदांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करायची. इथे कोणाची जिरवायची हे सभासद ठरवतील, असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिरवाजिरवीच्या वक्तव्याचा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परखड समाचार घेतला. जरंडेश्वर कारखाना कर्ज आणि ईडीला देण्यात आलेला तपशील या विषयावर खासदार उदयनराजे भोसले यांना बँकेच्या संचालक मंडळाने माहिती देण्यास नकार दिला असा आरोप खुद्द उदयनराजे यांनी शनिवारी बँकेत आले असता केला. याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी खंडन केले.
ते म्हणाले, माहिती देण्यास नकार दिला नाही. मात्र, ती माहिती देताना न्यायप्रविष्ट बाब असल्याने कायदेशीर सल्ला घेऊन माहिती देऊ, असे पत्र आम्ही त्यांना दिले. त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नाही. सामूहिक कर्ज वाटप प्रक्रियेत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सातारा जिल्हा बँकेने जे शंभर कोटींचे कर्ज मालमत्ता तारण म्हणून अदा केले. त्याची प्रक्रिया नाबार्डच्या नियमानुसार आहे. त्याच्या प्रत्येक ठरावाला संचालक मंडळाची मान्यता आहे. त्या वेळेच्या बैठकीला स्वतः उदयनराजे उपस्थित होते. त्याची कार्यवृत्तांत अहवालावर सही आहे. तरीसुद्धा ज्या बँकेचा देशभर लौकिक आहे. त्या बँकेविषयी सभासदांमध्ये सभ्रम निर्माण होईल, अशी वक्तव्ये करायची हे योग्य नाही.
जर कर्ज प्रकरणात चुकीचे घडत होते तर तेव्हाच का विरोध केला नाही, गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या 82 पैकी 62 सभांना हे गैरहजर होते. त्यामुळे त्यांनी आरोप करायचे आम्ही त्यांना उत्तरे घायची एवढा इथे कोणाला वेळ नाही आणि राहिला जिरवाजिरवीचा प्रश्न मतदार ठरवतील ना कोणाची जिरवायची ? असे थेट उत्तर शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले.