covaxin
भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन प्रमुख लसींपैकी कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना गेल्या काही दिवसांपासून सतावणारी चिंता दूर होण्याच्या मार्गावर आहे. कोव्हॅक्सिन जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिली नसल्यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांच्या परदेश प्रवासात अडथळे येत होते. जगातील अनेक देशांनी जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली लस घेतलेल्या नागरिकांनाच देशात प्रवेशाला परवानगी दिली असल्याने कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता ही चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे.
कोव्हॅक्सिनच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सध्या जागतिक आरोग्य संघटनेत सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारी EOI (Expression of interest) कोव्हॅक्सिननं दाखल केले असून जागतिक आरोग्य संघटनेनं ते स्विकारले आहेत. मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी काही अतिरिक्त डेटा जागतिक आरोग्य संघटनेनं मागवला असून त्यानंतर कोव्हॅक्सिनच्या इमर्जन्सी वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
१६ जून रोजी भारत बायोटेकनं मान्यतेसाठीच्या औपचारिकता पूर्ण केल्या आणि आता २३ जून रोजी पुन्हा एकदा उर्वरित कागदपत्रं आणि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी कोव्हॅक्सिनचे निर्माते जागतिक आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या लसीला पूर्ण मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेला मात्र थोडा अवधी लागू शकतो. [read_also content=”दोन-चार आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; रुग्णसंख्या ४ लाखांपर्यंत जाणार? टास्कफोर्सचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-maharashtra-in-two-to-four-weeks-will-the-number-of-patients-go-up-to-4-lakhs-taskforce-warning-nrvk-143781.html”]
तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे सर्व तपशील पुरवल्यानंतर कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळू शकते. भारतात फेज-३ मधील चाचण्या झाल्या असून ही लस ७८ टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलंय. आता ब्राझीलमध्ये फेज-३ मधील चाचण्या सुरु असून ही प्रक्रिया पूर्ण करून त्याचे तपशील जागतिक आरोग्य संघटनेकडे सोपवल्यानंतरच कोव्हॅक्सिनला मान्यता मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.