नवी मुंबई-: ऐरोली सेक्टर ८ येथे असलेल्या कपड्यांच्या दुकानावर हफ्तेखोरीसाठी धमकवल्याचा आरोप दुकानदार महिलेने शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मढवी यांच्यावर केला आहे. तर दुसरीकडे एम के मढवी यांनी या आरोपाला विरोधकांचे कटकारस्थान असल्याचे म्हणत आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत.
ऐरोली सेक्टर ८ येथे जयश्री पाटील व त्यांची मुलगी तृत्प्ती वाघ यांचे कपड्यांचे दुकान आहे. कपड्यांचा व्यवसाय सुरळीत होत नसल्याने त्यांनी आपल्या दुकानासमोर मार्जिनल स्पेसमध्ये पाणीपुरी व फळांचे दुकान लावले आहे. मात्र शुक्रवारी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृतपणे टाकलेल्या पाणीपुरी व फळांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कोणी केली याबाबत मात्र अद्याप अनभिज्ञता आहे.
वाघ यांचे म्हणणे आहे की; कारवाई पालिकेने नाही तर एम के मढवी यांनी खासगी माणसे आणून हफ्ते देण्यासाठी करायला लावली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप तृप्ती वाघ यांनी एम के मढवी यांच्यावर केला आहे. तर एम के मढवी यांनी या आरोपांचे खंडण केले असून निवडणूका आल्याने माजी आमदारांचे हे कटकारस्थान असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
याबाबत वाघ यांनी रबाळे पोलीस स्थानक गाठत तक्रार केली असून एम के मढवी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऐरोलीतील शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक एम के मढवी म्हणाले की; या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. त्या भागात पदपथाचे कामकाज सुरू असल्याने मी तिथे गेलो होतो. माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. हे माझ्या विरोधात माजी आमदारांचे कटकारस्थान आहे. निवडणुका आल्याने माझी खोटी बदनामी सुरू केली आहे.