कोणाच्याही चेहऱ्यावर आपल्यामुळे हास्य उमटणं ही जगातील सर्वात सुंदर भावना मानली जाते. पण काम तितकच कठीणही आहे. आपल्या अभिनयाने, विनोदाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अभिनेत्री नम्रता आवटे-संभेरावशी आम्ही या महिलादिनानिमित्त खास चर्चा केली. नम्रताने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून नम्रता घराघरात पोहोचली. यावेळी नम्रताने तिच्याविषयी अनेक गोष्टी आमच्याशी शेअर केल्या.
‘मी स्वतःला कोणत्याही ढाच्यात मांडत नाही. विनोदी अभिनेत्री वैगरे असं मी मानत नाही. मी एक अभिनेत्री आहे. मग ते कोणतही पात्र असो. पण हास्यजत्रेच्या निमित्ताने मला विनोदी अभिनेत्रीही म्हटलं जातं तेही मला फार आवडत आहे. रंजना देशमुख माझ्या आदर्श आहेत. अनेक महिला आता अशी विनोदी पात्रं साकारत आहेत, याचा मला फार आनंद होतोय.’
‘ठरवलं असं नव्हतं. शाळेत असताना मी एका नाटकात भाग घेतला होता. तेव्हा मला एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतला होता आणि मला पहिलं बक्षिसही मिळालं. तेव्हा मला वाटलं मी हे करू शकते. अनेकांनी मला सांगितलं तू यात प्रयत्न करून पाहायला हवे. आणि नंतर मी या क्षेत्रात आले. ठरवून नाही तर ओघाने मी क्षेत्रात आले.’
‘माझं शिक्षण शिवाजी विद्यालय, काळाचौकी, मुंबईतून झालं. माझ्या शाळेचा मला खूप जास्त पाठिंबा मिळाला. आमच्या शाळेत खूप जास्त सांस्कृतीक कार्यक्रम व्हायचे. अभ्यासासोबतच आमच्या कलागुणांनाही वाव दिला जायचा. माझ्या या क्षेत्रासाठी माझ्या शाळेचा खूप मोलाचा वाटा आहे.’
‘मी असं काहीही ठरवलं नाही. मला फक्त उत्तम काम करायचं आहे. इतरांचं मनोरंजन होईल अशीच कामं मला करायची आहेत.’
‘विनोद म्हटलं की, मग तो शाब्दीक, आंगिक, वाचिक असतो. प्रत्येकाची शैली वेगळी असते. माझं डॉलीचं पात्र मी ती मुलगी बवून साकारते. अनेकजनांकडून याची पोचपावतीही मिळते. तर प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही नकारात्मक माणसंही असतात जी सतत नकारात्मक गोष्टी पसरवतात तशीच काही सोशल मीडियावरही आहेत. पण विनोद हा विनोदी अँगलनेच घ्यायला हवा.’
‘मी आज जे काही आहे ते माझ्या आईमुळे, माझे सगळेच कुटुंबिय आई-बाबा, नंतर लग्न झाल्यावरही माझं दुसरं कुटुंब माझा नवरा, सासू सासरे सगळेच नेहमीच मला खूप सपोर्ट करत आले आहेत. मी खूप भाग्यशाली आहे की मला कोणीही आजवर म्हटलं नाही की तू या क्षेत्रात जाऊ नको. आणि ते इथवर पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.’
‘अशा खूप आठवणी आहेत. अनेक लोक येऊन भेटतात कामाचं कौतुक करतात. पण आम्ही दीवमध्ये शुट करत असताना अचानक एक दिवस मला जॉनी लिव्हर यांचा फोन आला त्यांनी विशेषतः माझ्या लॉली या पात्राचं कौतुक केलं जे माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय होतं. इतकचं नाही तर तर त्यानंतर ते आमच्या कार्यक्रमातही आले होते त्यावेळी त्यांनी खास माझ्यासाठी एक भेटवस्तू आणली होती. ते स्वतः एक मोठे कलाकार आहेत आणि त्यांची ही पोचपावती माझ्यासाठी खूप विशेष होती.’
‘सर्वात आधी विनोदी पात्र साकारताना ते विनोदी म्हणून करायला जाऊ नका. हास्यजत्रेत आम्ही ती सिच्युएशन ते वातावरण निर्माण करतो आणि त्यातून ते पात्र घडतं. तुमचं पात्र, अभिनय जितका खरा असेल तितका तो लोकांपर्यंत पोहोचतो. होतकरू कलाकारांना माझं हेच सांगणं आहे की आधी स्वतःला ओळखायला शिका मगच या क्षेत्रात या. शाळेतील, महाविद्यालयातील कार्यक्रमांमध्ये भाग घ्या. यातून तुम्हाला तुमची स्वतःची प्रचिती येईल. त्यानंतरच हे क्षेत्र निवडा.’
‘वाईट असं नाही. पण मी हास्यजत्रा जॉईन केलं तेव्हा माझा मुलगा ऋद्राज माझ्या पोटात होता. आणि त्याचवेळी माझं एक लहानसं ऑपरेशन झालं होतं. आणि लगेच दोनच दिवसांनी माझं शुटही होतं. आणि मला ते कॅन्सलही करायचं नव्हतं. तेव्हा मी डॉक्टरांची मदत घेतली. त्यांनी मला काही सल्ले दिले काही हावभाव न करण्यास सांगितले. ते सगळं सांभालून मी शूट पूर्ण केलं होतं. नंतर मात्र काही महिने मी ब्रेक घेतला. त्याच्या जन्मानंतर पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली. असे प्रसंग घडतात.’
‘आता सगळं खूप सोपं झालंय. ऋद्राज आता तीन वर्षांचा झाला आहे. त्यालाही समजतंय आई कामासाठी बाहेर जाते. माझे पती योगेश संभेराव, माझे सासू सासरे सगळेच माझ्या आणि कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्यामुळे हे फार सोपं जातं. पुढे तिने अनेकदा स्टेजवर बाळाची आठवण आल्याचंही सांगितलं. पण शेवटी कामही तितकच महत्त्वाचं आहे. सकाळी त्याचा पाहिलेला हासरा चेहरा दिवसभरासाठी काम करण्यासाठी उर्जा देतो.’