
फोटो सौजन्य- Guinness World Records
जगातील सर्वात उंच कुत्रा असेलेला केविन याचे निधन झाले आहे. केविन वयाच्या तिसऱ्या वर्षी मरण पावला. केविन 3 फूट 2 इंच इतका उंच होता. केविनला 20 मार्च रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून जगातील सर्वात उंच कुत्र्याचा अधिकृत टॅग मिळाला होता. अमेरिकेतील वुल्फ कुटुंब हे केविनचे मालक होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या निधनाची पुष्टी केली.
तीन वर्षीय केविन हा वुल्फ कुटुंबासह अमेरिकेतील वेस्ट डेस मोइन्स, आयोवा येथे राहत होता. वुल्फ कुटुंबातील ट्रेसी आणि रॉजर वुल्फ, अलेक्झांडर आणि एवा हे त्याचा सांभाळ करीत. तो काही दिवसांपूर्वी आजारी पडला होता त्याच्यावर शस्त्रक्रिया ही झाली होती मात्र त्यानंतर त्याचे निधन झाले आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रवक्त्याने निधनावर हळहळ व्यक्त करताना सांगितले की, “केविनचे अचानक अनपेक्षित शारीरीक गुंतागुंतीमुळे निधन झाले हे जाणून आम्हाला खूप दुःख झाले. ट्रेसी आणि ती ज्या पशुवैद्यकीय क्लिनिकमध्ये काम करते त्या टीमने केविन आजारी पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. आम्ही या कठीण काळात वुल्फ कुटुंबींयासोबत आहोत.
केविनच्या मालक ट्रेसी वुल्फ यांनी केवीनला श्रध्दांजली देताना असे म्हटले की, “आमचे संपूर्ण कुटुंब केविनच्या निधनाने उद्ध्वस्त झाले आहे. तो फक्त सर्वोत्तम असा आमचा उंच मुलगा होता! “आम्हाला खूप आनंद झाला होतो की तो विक्रम मोडू शकला आणि प्रकाशझोतात आला. त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले”.
केविन या नावाचे पण अनोखे वैशिष्ट होते. ‘होम अलोन’ या लोकप्रिय चित्रपटामधील केविन या पात्रावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते.सोशल मिडियावरही अनेकांनी केविनला श्रध्दांजली वाहिली आहे. अनेक प्राणीमित्रही या निधनाच्या बातमीवर दुख व्यक्त करत आहेत.
केवीनच्या अगोदर सर्वात उंच कुत्रा असण्याचा रेकॉर्ड अमेरिकेतील टेक्सासमधील ग्रेट डेन झ्यूस याच्या नावावर होता. त्याचाही तो 3 वर्षाचा असताना मृत्यू झाला होता.