
डॉ सुधीर आंबेकर, न्यूरोसर्जन, लीलावती हॉस्पिटल, मुंबई
ब्रेन ट्यूमर म्हणजेच मेंदूतील पेशींची असामान्य वाढ. या गाठी त्यांच्या आकारमानानुसार आणि स्थानानुसार अनेक लक्षणांना आमंत्रण देतात. ज्यामध्ये डोकेदुखी, गोंधळ उडणे, मेंदूला होणारा आघात, शरीराच्या एका भागात किंवा एका बाजूला येणारा अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू, शारीरीक संतुलन गमावणे, चक्कर येणे, ऐकू न येणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि दृष्टी समस्या यांचा समावेश आहे. हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. ब्रेन ट्यूमर असलेले अनेक रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जातात. मेंदूतील ट्यूमरचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेऊन आवश्यक ती पावले उचलली गेली पाहिजेत.ब्रेन ट्यूमर आणि मानसिक आरोग्य, प्रामुख्याने नैराश्य तसेच तणाव यांच्यात परस्पर संबंध आहे. जीवघेण्या स्थितीसह जगताना मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
एखाद्याला हे मान्य करणे कठीण जाईल की त्याला किंवा तिला ब्रेन ट्यूमर आहे. अशी व्यक्ती स्वतःला दोष देते आणि तिला लज्जास्पद वाटू शकते. निराशा, अस्वस्थता, एकटेपणा, तणाव, चिंता, नैराश्य, चिंता आणि लाज वाटणे अशा विविध प्रकारच्या भावनांचा अनुभव एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो. ब्रेन ट्यूमर म्हणजे मृत्यू असा लोकांचा गैरसमज आहे. मात्र वास्तविक पाहता तसे नसून ब्रेन ट्यूमरच्या उपचारानंतर सामान्य जीवन जगणे शक्य आहे.
ब्रेन ट्यूमरमुळे मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल.या स्थितीचा मानसिक परिणाम देखील विचारात घेतला पाहिजे. याकरिता विशेष थेरपी किंवा समुपदेशनाची मदत घेऊन,या आव्हानात्मक निदानाचा सामना करणाऱ्या रूग्णांचे एकंदर कल्याण सुधारणे शक्य आहे. ट्यूमर काढून टाकण्यासाठी उपचार हा शस्त्रक्रियेच्या स्वरूपात असेल, तर इतर उपचार पर्यायांमध्ये रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचा समावेश आहे. ट्यूमरचा प्रकार, आकार आणि स्थान यावर आधारित उपचार पद्धती डॉक्टर ठरवतील. आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि हार न मानता रोगनिदानाशी लढा देण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे.
[read_also content=”मॅक्सिकोमध्ये बर्ड फ्लूची लागण झालेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू, जाणून घ्या भयानक विषाणूची लक्षणे https://www.navarashtra.com/lifestyle/first-person-infected-with-bird-flu-death-in-mexico-543781.html”]
ब्रेन ट्यूमरच्या निदानासह जगणे आव्हानात्मक आहे, परंतु वेळीच निदान, उपचार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या संख्येने रुग्ण त्यांचे सामान्य जीवन पूर्ववत सुरू करू शकतात. तंत्रज्ञान आणि उपचारांमधील प्रगतीमुळे, रुग्ण त्यांची लक्षणे त्वरित व्यवस्थापित करू शकतात आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय त्यांचे जीवनमान सुधारता येऊ शकते. ब्रेन ट्यूमर असलेल्या व्यक्तींनी अशा तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे जो त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक काळजी घेणारी योजना तयार करेल.
उपचारादरम्यान एखाद्याने स्वत: ची काळजी आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. विश्रांतीसाठी प्रवृत्त करणाऱ्या क्रियाकलापांची निवड केल्याने तणावाची पातळी कमी होण्यास आणि मानसिकरित्या स्थैर्य राखण्यास मदत होऊ शकते. श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान, वाचन, संगीत ऐकणे किंवा बागकाम यासारखे छंद निवडा.ब्रेन ट्यूमर असलेले रुग्ण देखील आनंदाने आपले जीवन जगू शकतात. याकरिता तज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे, आपल्या मानसिक आरोग्याची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करणे आणि उपचार कालावधी दरम्यान आपण शांत राहणे गरजेचे आहे.