कांद्याची कुरकुरीत भजी बनवण्याची सोपी पद्धत
पावसाळ्यात रोज काही ना काही चटपटीत खायची इच्छा होते. बाहेर पाऊस चालू असेल तर चहासोबत वेगवेळ्या प्रकारच्या भजी, वडापाव यांसारखे अनेक चवदार पदार्थ आपण खातो. कांद्याची कुरकुरीत भजी तर सगळ्यांच्याच आवडीची असते. पण कांद्याची भजी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. त्यानुसार चवही वेगवेगळी असते.
आज तुम्हाला कांदा चिरण्याची एक छोटीशी ट्रीक सांगणार आहोत. या ट्रीकने तुमची भजी छान कुरकुरीत चवदार होतील. याशिवाय या रेसिपीमध्ये आपण बेसन वापरणे टाळणार आहोत. बेसनाशिवाय भजी कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी पूर्ण रेसीपी नक्की वाचा.
साहित्य
• कांदा
• 1-2 कप मुगडाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ
• लाल तिखट
• चाट मसाला
• आलं लसूण आणि हिरव्या मिर्चीची पेस्ट
• जीरा पावडर
• चिरलेली कोथींबीर
• चवीनुसार मीठ,
• आवश्यकतेनुसार पाणी
बेसनाशिवाय भजी कशी करायची ?
कृती
आता कांद्याची कुरकुरीत भजी कशी करायची ते पाहू. ते सुद्धा बेसनचा वापर न करता.
• कांदा घेतान गोलसर आकारचाच घ्या.
• आता कांदा चिरून घेऊ. यासाठी एक सोपी ट्रीक म्हणजे कांदा चिरताना उभा न चिरता आडवा चिरुन घ्या. यामुळे कांद्याचे लांब व बारीक काप होतील. भजी छान कुरकुरीत बनतील.
• कांदा चिरुन झाल्यावर त्यात मीठ टाकून काही मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे कांद्याला पाणी सुटेल. त्यामुळे पीठ मळताना त्यात पाणी टाकायची गरज पडणार नाही.
• आता बेसनाच्या ऐवजी भिजवलेल्या मूग डाळीची बारीक वाटलेली पेस्ट घ्या. तांदळाचे पीठही वापरू शकता. तांदळाच्या पीठामुळे भजीला चांगला कुरकुरीतपणा येईल. भजी जास्त तेलकट होणार नाहीत.
• आता पिठात एक ते दोन चमचे लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, एक चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिर्चीची पेस्ट, एक ते दोन चमचे जीरा पावडर, एक ते दोन कप चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून पीठ थोडं घट्टसर मळून घ्या.
• पिठाचा अंदाज घेऊन मग कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल एकदा तापले की मग, गॅसची आच मंद करा व भजी तळून घ्या. तेल खूप जास्त तापवू नका नाहीतर तेल भजी करपतील आणि मग आतून कच्च्या राहतील.
अशा रीतीने तुमची बेसन न वापरता कांद्याची कुरकुरीत भजी तयार होतील. तुमच्या आवडत्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस बरोबर भजीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.