
एकवेळ कमी, जेवा पण भरपूर पाणी प्या…(summer)असा सल्ला सध्या सगळेच देत आहेत. कारण, उन्हाळा प्रचंड वाढला आहे. उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेच, पण अनेक उष्णतेचे विकार जडतात. उन्हाळ्यात भूक मंदावते,शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. यामुळे,थकवा,अशक्तपणा जाणवतो. तसंच,घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडतं. अशा वेळी, हलका आणि कमी आहार घेणं. जास्तीत जास्त माठातील पाणी, ताक,लिंबू सरबत,कोकम सरबत,ऊसाचा रस तसंच काही फळांचा ज्यूस घेणं तब्येतीसाठी अधिक उत्तम ठरू शकेल.
काय खालं?
दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन या दिवसात करणं आवश्यक आहे. ताक पिताना त्यात सैंधव मीठ,जिरे पूड आणि खडीसाखर घालून प्यायल्यास पचनाचा त्रास होणार नाही. उन्हाळ्यात अनेकांना पोटविकार जडतात अशावेळी ताक पचनासाठी उत्तम असतं. त्याचबरोबर दही,लस्सी,तूप यांचाही पुरेसा प्रमाणात आहारात समावेश करा.
कोणत्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश कराल?
उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा हा मिळतो. आंबा हा उष्ण जरी असला तरी, आंब्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे, आंबा,कलिंगड,टरबूज,फणस,डाळिंब,करवंदे ही फळे खाल्ली तर शरीरातील उष्णतेची दाहकता कमी होण्यास मदत होईल.आवळा, कोकम, शहाळे, ताडगोळे यांचं नियमित सेवन केल्यास उष्मा कमी प्रमाणात जाणवेल. पालेभाज्या,फळभाज्यांसोबत कोशिंबीर,सलाड यांचा समावेश आहारात करावा.
[read_also content=”‘भूकच लागत नाही, गेल्या 17 वर्षात अन्नाचा कणही खाल्लेला नाही, फक्त कोल्ड्रिंक पिऊन जिवंत’, एका व्यक्तीच्या अजब दाव्यानं प्रचंड खळबळ https://www.navarashtra.com/viral/a-persons-strange-claim-caused-a-lot-of-excitement-in-the-last-17-years-i-only-survive-by-drinking-cold-drinks-havenot-eaten-a-single-grain-of-food-nrvb-399676/”]
आईस्क्रिम,कोल्ड्रींक्स,मद्यपान यांचं सेवन कमी करावं. तसंच,मांसहारी पदार्थ, अंडी मसालेदार पदार्थांचं प्रमाण आहारात कमीत कमी ठेवावं.
पोटाच्या तक्रारींपासून कशी मुक्तता मिळवाल?
उन्हाळ्यात पोटाच्या तक्रारी अधिक असतात. अशावेळी, रोज जेवणानंतर दालचिनी पावडर मधात मिसळून त्याचं सेवन करा. रात्री एक चमचा गुलकंद आणि एक कप दूध पिऊन झोपा. रोज सकाळी दोन खजूर साजूक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
युरिन इन्फेक्शन कसं टाळालं?
पुरूषांपेक्षा महिलांमध्ये उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या जागी संसर्ग होणे ही सर्रास आढळून येणारी आणि अतिशय वेदनादायक समस्या आहे. याचा त्रास कोणालाही होऊ शकतो, उन्हाळ्यात याचे प्रमाण खूप जास्त वाढते. उन्हाळ्यातील उष्ण व आर्द्र हवामानामुळे हा त्रास होण्याचा धोका वाढतो. महिलांनी हायड्रेट ठेवणे, प्रोबायोटीकचे सेवन अधिक करणे, पोषक आणि तंतूमय आहाराचा समावेश करणे,योनीमार्ग स्वच्छ ठेवणे,लघवी अडवून न ठेवणे हे केल्यास उष्म्यापासून नक्कीच बचाव होऊ शकतो.