आईचे दूध बाळासाठी अमृतासमान असते. आईने केलेले स्तनपान बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) केवळ पहिल्या सहा महिन्यांसाठी स्तनपानाची शिफारस करण्यात आली आहे. परंतु स्तनपान करताना काही काळजी (Breastfeeding Tips) घेणे गरजेचे असते. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या स्तनपान सल्लागार मानसी शाह यांनी स्तनपान करणार्या मातांसाठी काय करावे आणि काय करू नये (Breastfeeding Do’s And Don’ts) याविषयी माहिती दिली आहे.
स्तनपान करताना काय करावे? आणि काय करू नये?
प्रसूतीपूर्व काळात स्तनपानाविषयी शिक्षण घ्या: कारण ते पालकांना तयार होण्यास आणि स्तनपानाच्या गरजांची अपेक्षा करण्यास मदत करते. लक्षात ठेवा स्तनपान हे नवीन कौशल्य शिकण्यासारखे आहे. पहिल्यांदा माता बनलेल्या स्त्रियांसाठी योग्य ज्ञान, संयम आणि पुनरावृत्तीसह नवीन कौशल्य शिकणे सोपे असते. नवीन गोष्टी आत्मसात करताना हार मानू नका.
जन्मानंतर लगेचच तुमच्या त्वचेचा बाळाशी त्वचेशी संपर्क सुरू करा आणि तुमच्या आरोग्य सेवकांच्या टीमच्या मदतीने जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू करा. वेदनाशामक औषधे घेणे टाळा. कारण त्यामुळे बाळाला तंद्री येऊ शकते, बाळाची दूध पिण्यास इच्छा कमी होऊ शकते आणि स्तनपान सुरू करण्यास उशीर होतो.
प्रसूतीनंतरचे पहिले दोन ते तीन दिवस आईच्या अंगात रंगहीन ते पिवळ्या रंगाचे दूध तयार होते, त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. जेव्हा आई बाळाला वारंवार दूध पाजते तेव्हा ते कमी प्रमाणात तयार होते, परंतु बाळासाठी पुरेसे असते. हे पहिले दूध उत्तम पोषण आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोलोस्ट्रम हे अशुद्ध दूध आहे असे समजून ते टाकून देऊ नका किंवा फेकून देऊ नका आणि या काळात दूध उत्पादन अद्याप सुरू झाले नाही असे समजून बाळाला स्तनपान न करण्याची चूक करू नका. तसेच काही मुले या काळात थोडे जास्त रडतात, बाळाला इतर कोणतेही दूध किंवा द्रव जसे की पाणी, साखर पाणी, मध इत्यादी देण्याचा मोह करू नका कारण यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
बाळंतपणानंतर बाळाला त्याच पलंगावर किंवा त्याच खोलीत आईच्या जवळ ठेवा. यामुळे बाळाची दूधासाठी मागणी वाढणे, आईला बाळाचे संकेत ओळखणे आणि बाळाला ओळखणे असे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई आणि बाळामध्ये मजबूत भावनिक बंध निर्माण करण्यास मदत होते. बाळाला वेगळ्या खोलीत ठेवू नका.
स्तनपान हा एक आनंददायी अनुभव आहे. स्तनपान करताना बाळाला योग्य स्थितीत ठेवा यामुळे ते व्यवस्थित दूध पिते आणि आईला देखील स्तनपान करताना वेदना होणार नाहीत. वेदना होत असतील तर स्तनपान सुरू ठेवू नका. बाळाच्या पहिल्या काही शोषणानंतर आईला वेदना होत असेल तर बाळाला थोडं दूर करा आणि योग्य स्थितीसह पुन्हा फिडिंग सुरु करा.आयुष्याच्या 1 ते 6 महिन्यांसाठी बाळाला फक्त आईचे दूध द्या. या काळात पाणी देऊ नका कारण आईच्या दुधात पुरेसे पाणी असते जे उन्हाळ्यातही बाळाची पाण्याची गरज भागवेल. उचकी येणे ही लहान मुलांची सामान्य समस्या आहे याचा अर्थ बाळाला तहान लागली असा होत नाही.
आईच दूध बाळासाठी पुरेसे आहे की नाही हे पासण्यासाठी त्याच्या लघवी आणि वजनाची मासिक तपासणी करा. बाळाने २४ तासांत कमीत कमी ६ ते ७ वेळा लघवी केली पाहिजे आणि दर महिन्याला बाळाचे वजन किमान ५०० ग्रॅमने वाढले पाहिजे. यावरून बाळाला आईचे दूध पुरेसे दूध आहे हे लक्षात येते. बाळाच्या रडण्याला नेहमी भूक लागणे किंवा आईच्या अपुऱ्या दुधाशी जोडू नका.