World No Tobacco Day
तळेगाव – कर्करोगासह अनेक दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन टाळण्याचे आवाहन तळेगावच्या टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग, पक्षाघात/लकवा, फुप्फुसाचे आणि हृदयाचे आजार, टीबी, श्वसनसंस्थेचे विकार होतात. तंबाखूचे सेवन हे जागतिक स्तरावर मृत्युचे प्रमुख कारण ठरत आहे आहे.
जगामध्ये दरवर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्यु हा तंबाखूच्या सेवनाने होतो. यापैकी ५४ लाख लोक हे तंबाखूच्या प्रत्यक्ष वापरामुळे मरतात. ६ लाख लोक दुसºया व्यक्तीने केलले धूम्रपान / Second Hand Smoking मुळे वातावरणात सोडलेल्या धुराचा प्रवेश त्यांच्या शरीरात झाल्यामुळे मरतात. तज्ज्ञांनी अभ्यासानुसार २०३० पर्यंत जगामध्ये ८० लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनामुळे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
50 टक्के लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे
कॅन्सर होण्यासाठी तंबाखू हा अतिशय घातक आणि कारणीभूत ठरणारा पदार्थ आहे. तंबाखू वापरणाऱ्यांपैकी ५० टक्के लोक तंबाखूच्या वापरामुळे मरतात. महाराष्ट्रात ४२ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रिया तंबाखूचा वापर करतात. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये याचे जास्त प्रमाण असून वयाच्या आठव्या वर्षापासून मुले तंबाखू सेवन करतात, असा निष्कर्ष समोर आला आहे.
[read_also content=”फ्लेवर्ड हुक्का, ई-सिगारेटचे सेवन घातकच https://www.navarashtra.com/lifestyle/world-no-tobacco-day-experts-says-tobacco-consumption-through-e-cigarettes-flavored-hookahs-is-dangerous-539290/”]
काय आहेत लक्षणे
आवाज बदलणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, खोकल्यातून रक्त बाहेर पडणे, तोंडात न भरणारी जखम होणे, न दुखणारी जखम होणे, एखादी न दुखणारी गाठ वाढणे, अनैसर्गिक रक्तस्राव होणे आदी तंबाखूतून झालेल्या कॅन्सरची लक्षणे आहेत.
शरीरावर होणारा परिणाम
तंबाखूजन्य पदार्थांमुळेच रक्तदाब वाढतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (एलडीएल) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) घटते. तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अॅन्टबीन, अॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मर्क्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात.
तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय आणि जठराचा कर्करोग होतो. वेळीच धूम्रपान करणं थांबवणं गरजेचं आहे. कारण तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन म्हणजे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो.
तज्ज्ञांचे म्हणणे
तळेगावच्या टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे कर्करोग तज्ज्ञ डॉ. मृणाल परब सांगतात की,तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देणे. शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सर होतो. म्हणून वेळीच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपानाचे व्यसन टाळणे गरजेचे आहे.