
लग्नानंतर प्रत्येक मुलीला कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर नवीन वातावरणात राहण्याची सवय करावी लागते. कधी सासू-सुनेचे नाते चांगले जमते तर कधी काही तणाव निर्माण होतो. पण जर हा संघर्ष वाढत गेला आणि तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता येऊ लागली तर त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होऊ शकते.
चला तर मग जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या सासूसोबतचे नाते सुधारू शकता. तुम्ही या लेखात सांगितलेल्या टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या सासूसह नाते चांगले होऊ शकते. नात्यात चढउतार तर येणारच. पण समजूतदारपणा नात्याला अधिक भक्कम बनवतो हे नक्की. या Mother’s Day च्या निमित्ताने करा या नात्याची गोड सुरूवात.
रागाने किंवा नकारात्मक बोलल्याने नातेसंबंध बिघडू शकतात. जेव्हा तुमची सासू तुम्हाला दुखावणारे काही बोलते किंवा करते तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. मग आरामात तुमचे मत तुमच्या सासूबाईंसमोर मांडा. यामध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याचीही मदत घेऊ शकता.
प्रत्येक नात्याप्रमाणे सासू-सुनेच्या नात्यातही सीमा असणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि तुम्हाला तुमचे आयुष्य कसे चालवायचे आहे ते ठरवा. या सीमा घरातील काम शेअर करण्यापासून निर्णय घेण्यापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी असू शकतात. तुमच्या सासूलाही या सीमांबद्दल आदरपूर्वक सांगा जेणेकरून तुमच्या नात्यात कटूता येणार नाही.
संवादाच्या अभावामुळे बहुतेक गैरसमज निर्माण होतात. सासू-सासऱ्यांशी रोज तुम्ही संभाषण करा. मनात आधीपासून ठरवून ठेऊ नका. त्यांच्या दिवसाबद्दल विचारा, त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना तुमचे छंद आणि तुमच्या आयुष्याबद्दल देखील सांगू शकता. यामुळे तुमच्या दोघांमध्ये चांगले नाते निर्माण होईल आणि तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकाल.
स्तुती केली की सर्वांनाच ते आवडते. जर तुमच्या सासूने चांगला स्वयंपाक केला असेल किंवा त्यांच्याकडे काही खास कला असेल तर तिची नक्कीच प्रशंसा करा. तुम्ही ते त्यांच्याकडून शिकण्यासाठी त्यांची मदत घ्या. तुमच्या आयुष्यात त्यांची गरज आहे याची जाणीव करून द्या. ज्यामुळे नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
वाचा – https://www.navarashtra.com/blogs/how-to-maintain-relationship-know-the-tips-nrsr-435496/
नाती बदलायला वेळ लागतो. एका रात्रीत सर्व काही ठीक होईल असा विचार करू नका. जर तुम्ही वर नमूद केलेल्या टिप्सचे पालन केले तर तुमचे नाते नक्कीच हळूहळू सुधारेल. आधी काही चुका झाल्या असतील तर त्या बोलून मनातील गोष्टी दूर करा आणि एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहा. समजून घेतलं तर नक्कीच सासूदेखील आई होऊ शकते.