

अल्पना आर्ट ही बंगालमधील पारंपरिक लोककला असून तांदळाच्या पेस्टपासून सुंदर नक्षी तयार केली जाते.
कमळ, सूर्य, चंद्र, शंख आणि भूमितीय आकार हे अल्पना कलेतील लोकप्रिय डिझाइन्स आहेत.
सण-उत्सवांबरोबरच भिंती, कॅनव्हास, दिवे आणि प्रवेशद्वाराच्या सजावटीतही अल्पना आर्टचा वापर करता येतो.
भारतीय संस्कृतीमध्ये विविध पारंपरिक कलांना विशेष महत्त्व आहे. रांगोळी, वारली चित्रकला, मधुबनी पेंटिंग यांसारख्या कलांप्रमाणेच ‘अल्पना आर्ट’ ही बंगालमधील एक सुंदर पारंपरिक लोककला आहे.त्यामध्ये मातीच्या रंगाच्या जमीनीवर पांढऱ्या रंगांची सुंदर आकाराचे डिझाइन्स काढले जातात. जे दिसताना रांगोळी काढल्या सारखे दिसतात. ज्यांना पर्मनंट रांगोळी हा प्रकार आवडतो त्यांना हे अल्पना आर्ट अतिशय आवडेल. सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि शुभप्रसंगी घराचे अंगण सजवण्यासाठी या कलेचा वापर केला जातो.तसेच तुम्ही तुमच्या गावच्या घराच्या अंगणामध्ये ही कला साकारू शकता. विशेष म्हणजे, पारंपरिक पद्धतीने तयार होणारी ही कला आता आधुनिक होम डेकोरमध्येही लोकप्रिय होत आहे.
अल्पना ही पश्चिम बंगालमधील पारंपरिक रांगोळीची एक पद्धत आहे. तांदूळ भिजवून त्याची पांढरी पेस्ट तयार केली जाते. या पेस्टच्या मदतीने जमिनीवर सुंदर नक्षीकाम केले जाते.त्यामध्ये तुम्हाला हवी असलेले डिझाईन्स तुम्ही काढू शकता. पूर्वी ही कला हाताच्या बोटांनी साकारली जात असे. त्यामुळे प्रत्येक डिझाइनमध्ये कलाकाराची कल्पकता आणि कौशल्य पाहायला मिळते.
या कलेमध्ये कमळाचे फूल, सूर्य, चंद्र, शंख, मासे, पाने आणि गोलाकार नक्षी यांचा वापर केला जातो. कमळाचे फूल पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तसेच भूमितीय आकार आणि बारीक रेषांच्या मदतीने आकर्षक डिझाइन्स तयार केले जातात.ह्यामध्ये मोठ्याप्रमाणावर नक्षीकाम होताना दिसते. ज्याने येणार जाणारी व्यक्ती बघत राहील.
दुर्गापूजा, लक्ष्मीपूजा, दिवाळी आणि लग्नसमारंभ अशा शुभप्रसंगी अल्पना काढण्याची परंपरा आहे. विशेषतः लक्ष्मीपूजेच्या वेळी घराच्या प्रवेशद्वाराजवळ अल्पना काढली जाते. घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी, अशी यामागे पारंपरिक श्रद्धा आहे. सणासुदीच्या काळात आपल्याकडे दररोज रांगोळी काढण्याची पद्धत असते.तसेच तुम्ही सुद्धा अश्या प्रकारची कला तुमच्या घराच्या दारात काढू शकता.
पारंपरिक अल्पना काढण्यासाठी तांदळाची पेस्ट आणि पाणी वापरले जाते. आधुनिक पद्धतीमध्ये पांढरे रंग, नैसर्गिक रंग, ब्रश आणि रंगीत पावडरचाही वापर केला जातो. त्यामुळे विविध रंगांमध्ये सुंदर डिझाइन्स तयार करणे शक्य होते.
पूर्वी केवळ अंगण आणि जमिनीवर काढली जाणारी अल्पना आता भिंती, कॅनव्हास, सजावटीच्या वस्तू, दिवे आणि प्रवेशद्वार सजवण्यासाठी वापरली जात आहे. पारंपरिक नक्षीला आधुनिक रंगांची जोड देऊन कलाकार आकर्षक कलाकृती तयार करत आहेत. अल्पना आर्ट ही केवळ सजावटीची पद्धत नसून बंगालच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक कलेला आधुनिक रूप देत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम या कलेच्या माध्यमातून होत आहे.