एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
अकोला : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस प्रवासातील विविध सवलतींच्या डिजिटायझेशन प्रक्रियेचे करण्याचा निर्णय घेतला असून, प्रवासात पारदर्शकता आणण्यासह बनावट ओळखपत्रांच्या वापराला आळा घालण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. या मोहिमेला अकोला विभागातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शुक्रवारपर्यंत विभागातील ४ लाख ५६ हजार २२१ प्रवाशांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ३ लाख १५ हजार ४०८ प्रवाशांना कार्डचे वितरण करण्यात आले आहे. अकोला बस डेपो क्रमांक दोनमध्ये ११ हजार ८३९ प्रवाशांनी नोंदणी केली असून, ६ हजार १२९ जणांना कार्ड वितरित करण्यात आले आहे. उर्वरित प्रवाशांना कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांचा मोठा वाटा आहे.
नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारितील सर्व आगारांमध्ये एनसीएमसी कार्डसाठी सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड काढणे आवश्यक आहे. कार्ड वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू असून, जास्तीत जास्त नागरिकांनी कार्ड काढून एसटी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू
नोंदणीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. महामंडळाकडून विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध पुरस्कार विजेत्यांसह एकूण ३५ प्रवर्गातील प्रवाशांना प्रवासात सवलत दिली जाते. मात्र, सवलतींचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट ओळखपत्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सवलतीचा लाभ पोहोचवण्यासाठी एनसीएमसी कार्ड फायद्याचे ठरेल.
गहाळ झाल्यास 149 रुपयात नवीन कार्ड
कार्ड खराब झाल्यास किंवा गहाळ झाल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. कार्डमध्ये किमान १०० रुपयांचा शिल्लक बॅलन्स ठेवणे अनिवार्य असून, त्यानंतर ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील ईटीआयएम मशीन, महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप तसेच एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या सरल क्रमांकाशी, तर ज्येष्ठ नागरिक व महिलांचे कार्ड आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी क्रमांकाची जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे.






