वसई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात, इनामी आणि फरारी टोळीला अटक करण्याची कामगिरी गुन्हे शाखा कक्ष -३ ने केली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील -शिरसाड फाटा येथील भारत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या बातमीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-३ ने विरार पूर्व, जिवदानी मंदीर हेलीपॅड परिसरातुन कुख्यात अंतरराज्यीय टोळीतील मनिष ऊर्फ राजु मोहन चव्हाण, राहणार वैजापुर-औरंगाबाद, भाऊसाहेब शंकर गवळी राहणार नेवासा-अहमदनगर, रविंद्रसिंग सुखराम सोलंकी, सुखचेन रेवत पवार, मॉन्टी नंदु चौहान राहणार गुणा – मध्यप्रदेश आणि अचिनी रुपचंद चव्हाण, श्रीरामपुर- अहमदनगर यांना ताब्यात घेतले. त्यावेळी या टोळीने पळून जाण्यासाठी प्रतिकार केला, त्यामुळे पोलीसांनी बळाचा वापर करुन त्यांना अटक केली. त्यांच्या कब्जातून स्कॉर्पीओ, जिप, रिक्षा, लोखंडी कोयता, सुरा, बॅट-या,नायलॉनची दोरी, कटावण्या, मिरची पूड, मोबाईल फोन व रोख रक्कम, दागीने असा एकूण १० लाख,१६ हजार,३७६ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या आरोपींविरोधात विरार पोलीस ठाण्यात ३९९, ४०२, ३७३, ३३२ सह आर्म अॅक्ट ४, २५, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३० (१) (३), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींची कसून चौकशी केल्यावर अर्नाळा, वाडा, गणेशपुरी, घोटी पोलीस ठाणे (नाशिक ग्रामिण) पोलीस ठाण्यात यापुर्वी गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तसेच, मनिष उर्फ राजू मोहन चलाण याचे विरुध्द शहापूर, पिंपरी, पिंपरी-चिंचवड,अहमदनगर, विश्रामबाग-सांगली, कराड या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर रचिंद्र मुखराम सोलंकी विरुध्द धरणवाडा, त्रिगुणा-मध्यप्रदेश, धरनावदा – मध्य प्रदेश, केट-मध्यप्रदेश, छिमाबरोद-राजस्थान या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेश पोलीसांनी त्याच्यावर आणि सुखचैन रेवन पवार वर मध्यप्रदेश पोलीसांनी पाच हजार रुपयांचे इनाम लावले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख,उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, महिला उपनिरीक्षक रंजना सिरगीर,अशोक पाटील, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, प्रविण वानखेडे गणेश यादव, सागर सोनवणे, चेतन निंबाळकर, दत्ता जाधव, आनंद राठोड, विजया मॅंगेरी, सफौ संतोष चव्हाण यांनी ही कामगिरी केली.