मुंबई – अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारातून फरार आरोपी शहिम अहमदला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेली अटक कायदेशीर असल्याचा निर्वाळा विशेष एनआयए न्यायालयाने दिला.
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटर सायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातच एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. तर आरोपी शहिम अहमदला फरार म्हणून घोषित केले होते आणि एनआयएकडून शहिमवर दोन लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यातच २१ सप्टेंबर रोजी अहमदला मुंबई सत्र न्यायालय परिसरातून एनआयएने अटक करण्यात आली.
अहमद स्वत: न्यायालयात शरण आला होता. मात्र, तो शरण येण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच एनआयएकडून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान अहमदविरोधात झालेली कारवाई योग्य असून अटक कायदेशीर होती असे स्पष्ट करत न्यायालयाने अहमदची मागणी फेटाळून लावली.