बीड : बीड मधील मुंडे भावा-बहिणीचा राजकीय वैर आजपर्यंत सर्वांनी पाहिलं आहे. कालच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला त्यानंतर पंकजा मुंडे यांना बोलताना भान राहत नाही अशी टीका धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आली. हे वार पलटवार नेहमी सुरूच असतात, त्यातच आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चेकमेट दिलाय. धनंजय मुंडे यांना चेकमेट देत पंकजा मुंडे यांनी केज नगरपंचायत काबीज केली आहे. या नगपंचायतीत जनविकास आघाडीच्या ०८ तर राष्ट्रवादी- ०५, काँग्रेस- ०३, स्वाभिमानी -०१ अशा एकूण जागा १७ आहेत. केजमध्ये काँग्रेस आणि जनविकास आघाडी एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इथे पंकजा मुंडे यांनी आपलं गणित जुळवत ही युती केली आहे. जनविकास आघाडी ही भाजप पुरस्कृत आहे, ती काँग्रेसबरोबर सत्तेत बसणार आहे.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्ह्य अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयातीमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी शिवनेरी बंगला येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले.
जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येलाही पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या १३ उमेदवारांना २७८ मतांवर समाधान मानावे लागले. सेनेच्या ११ उमेदवारांची अनामत जप्त झाली. तर, जनविकास परिवर्तन आघाडीला आठ जागा मिळाल्या. निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढली असली तरी दोन्ही पक्षांच्या जागा आठ होत्या.
तर, स्वाभिमानी पक्षाने एक जागा जिंकल्याने त्यांना मात्र सत्तेची चावी आमच्याच हाती असा भ्रम झाला होता.मात्र, बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जनविकास आघाडी आणि काँग्रेसने आपले गाव आपले सरकार असा नारा देत एकत्र येण्याची घोषणा केली. खासदार रजनी पाटील यांच्या शिवनेरी निवासस्थानी आघाडी व काँग्रेसच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली.
या निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर, हारूण इनामदार व अंकुश इंगळे यांची आघाडी करून लढण्याची खेळी कांहीअशी का होईना यशस्वी झाली आहे. त्यामुळे कोणालाही सत्ता स्थापनेसाठी इतरांची मदत घेणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार हा समझोता झाला.