

खरीप नुकसानीनंतर रब्बीचीही चिंता
बुलढाण्यात बोअरवेल-विहिरींसाठी अर्जांचा ओघ
जिल्हा प्रशासनाकडे परवानगी अर्ज वाढले
बुलढाणा: यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. खरीप पिकांच्या नुकसानीतून सावरण्याची धडपड सुरू असतानाच आता रब्बी हंगामालाही दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. सध्याचे हवामान रब्बी पिकांच्या वाढीसाठी पोषक असले, तरी जमिनीतील घटलेली ओल आणि जलसाठ्यांमधील पाण्याची कमतरता शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
परिणामी, रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. गतवर्षी बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात तब्बल ३ लाख ८९ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम थेट पेरणीवर झाला असून, आतापर्यंत अवघ्या ९० हजार ६६३ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी घटली. म्हणजेच रब्बीच्या पेरणी क्षेत्रात जवळपास ७७ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. ही आकडेवारी जिल्ह्यातील गंभीर पाणीटंचाईचे वास्तव अधोरेखित करणारी आहे.
रब्बी पिकांच्या पेरणीसाठी सध्याचे हवामान अनुकूल असले, तरी पाण्याअभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे तलाव, लघुसिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प तसेच विहिरींमधील जलसाठ्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रब्बी पिके घेण्याची इच्छा आणि आर्थिक तयारी असूनही अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पेरणीचे क्षेत्र कमी करावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर रब्बी हंगामातून माघार घेण्याची वेळ आली.
दरम्यान, सिंचनासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्यांचा बोरवेल आणि विहिरी खोदण्याकडे कल वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने बोरवेल व विहिरी खोदण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले असल्याने परवानगीसाठी अर्जाची संख्या झपाट्याने वाढत आहे. खरीप हंगामातील नुकसानीनंतर रब्बी हंगामातून आर्थिक आधार मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले.
वाडीचे, साहेबराव उबरहंडे म्हणाले की, माझ्याकडे गायी, म्हशी, बैल असे १३ जनावरे असून मी दुग्धव्यवसायावर माझा उदारनिर्वाह करतो. मात्र, सद्यस्थितीला जनावरांना पाणी उपलब्ध नसल्याने शासनाकडे बोअरघेण्यासाठी परवानगी मागितली आहे.
शेतकरी, मनोज उन्हाळे म्हणाले की, माझी अंत्री तेली शिवारात शेती असून तीन एकर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. हळद पिकासाठी हवामान पोषक आहे मात्र विहिरीचे पाणी कमी पडल्याने हळद पीक वाळत आहे. सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे बोअरवेल घेण्यासाठी अर्ज केला आहे.