Chikhli Crime Illegal Pistol Seized
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस स्टेशनचे डी. बी. पथक पोलिस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त घालत होते. यावेळी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू होती. दरम्यान, एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाकडे अवैध अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली शहरातील संभाजीनगर परिसरातील गोपाल किराणा दुकानासमोर सापळा रचला. काही वेळाने माहितीतील संशयित तरुण पायी जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केलीअसता त्याने आपले नाव ईश्वर प्रकाश धनवटे (२५, रा. गौरक्षणवाडी, चिखली) असे सांगितले.
पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेच्या उजव्या बाजूला देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पिस्तूलसोबत मॅगझीनही मिळूनआले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली – पोलिस स्टेशनच्या डी. बी. पथकाने ही कारवाई यशस्वी केली. कारवाईत पोहेकाँ – अमोल गवई, अजय इटाबा, प्रशांत धंदर, – ज्ञानेश्वर शिंदे, राहुल पायघन, नीलेश – सावळे, मपोहेकाँ ललिता खरात आणि मपोका रुपाली उगले यांनी सहभाग घेतला.
जप्त करण्यात आलेले पिस्तूल देशी बनावटीचे असून, त्याच्या हँडलवर काळ्या रंगाची प्लास्टिक ग्रीप आहे. या ग्रीपच्या दोन्ही बाजूंवर गोल्डन रंगाचा पंचकोनी स्टार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिस्तूल व मॅगझीनची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले. अवैध अग्निशस्त्र बाळगून फिरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेला आणखी बळ मिळाले.
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपी ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ अन्वये चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकों अमोल गवई करीत आहेत. जप्त केलेल्या शस्त्राचा वापर यापूर्वीच्या कोणत्या गुन्ह्यात झाला आहे का, तसेच आरोपीकडे है पिस्तूल कोठून आले, याबाबतही तपास केला जाण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून अवैध शस्त्रांचा वापर होऊ नये, यासाठी चिखली पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणा-यांमध्ये पोलिसांचा धाक न निर्माण झाला असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला? मुख्यमंत्र्यांकडून दखल; केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर






