Chandrapur News: चंद्रपूरमध्ये चारा टंचाईचे संकट? पशुपालकांनी आतापासूनच करा हे नियोजन, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला
दुष्काळाच्या काळात हिरवा आणि सुका चारा उपलब्ध करून देणे हे पशुपालकांसमोरील मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चाऱ्याचा अपव्यय टाळून जनावरांना योग्य प्रमाणात खाद्य देणे आवश्यक आहे. चाऱ्याची कुट्टी करून जनावरांना दिल्यास साधारण २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. तसेच निकृष्ट दर्जाच्या सुक्या चाऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यास त्याची पचनीयता आणि पोषणमूल्य वाढविण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – AI Created)
धानाची पेंढी, सोयाबीन कुटार, मक्याचे अवशेष, गव्हाचे काड आणि तुरीचा भुसा यांचा योग्य पद्धतीने वापर करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करता येतो. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग करण्यावर भर द्यावा, युरिया प्रक्रिया केलेला चारा तयार करताना मात्र पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुपोषण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
बुरशी लागलेला अथवा दूषित चारा जनावरांना देऊ नये. हिरव्या चाऱ्याचा साठा करून ठेवण्यासाठी मुरघास निर्मिती हा प्रभावी पर्याय आहे. हिरव्या मका किंवा ज्वारीची योग्य अवस्थेत कापणी करून बारीक कुट्टी करावी आणि ती खड्यात, सिमेंटच्या टाकीत किंवा विशेष सायलेज बॅगमध्ये हवाबंद पद्धतीने साठवावी. योग्य प्रक्रियेद्वारे तयार केलेला मुरघास साधारण ४५ ते ५० दिवसांत वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो. दुष्काळाच्या काळात जनावरांना रसाळ चारा देण्यासह दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ल्युसनं, बरसीम आणि ओट यांसारख्या चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे. पाणीटंचाई असलेल्या भागांत उपलब्ध पाण्याचा विचार करूनच पिकांची निवड करावी. गावपातळीवर सामूहिक चारा साठवणूक आणि मुरघास निर्मितीचे नियोजन केल्यास टंचाईची तीव्रता कमी करता येईल.
Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले
अझोला ही पाण्यावर वाढणारी प्रथिनयुक्त वनस्पती असून जनावरांच्या पूरक आहारासाठी उपयुक्त आहे. सावलीच्या ठिकाणी योग्य व्यवस्था करून अझोला संवर्धन केल्यास साधारण १५ ते १८ दिवसात त्याची काढणी सुरू करता येते. गाई, म्हशी आणि शेळ्यांच्या आहारात त्याचा पूरक खाद्य म्हणून समावेश करता येतो.






