cidco
नवी मुंबई : सिडको महामंडळाने (Cidco) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) यांच्या मार्गदर्शनाखाली जगप्रसिद्ध प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा (Precast Technology) वापर करून ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण केले आहे. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दीष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे.
सिडकोतर्फे ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
[read_also content=”मुंबै बँक प्रकरणातील मोठी अपडेट – प्रवीण दरेकरांकडून बिनशर्त याचिका मागे https://www.navarashtra.com/maharashtra/pravin-darekat-took-back-his-petition-about-mumbai-bank-case-nrsr-308039.html”]
सिडकोने ‘मिशन ९६’ अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार कंत्राटदार मे. लार्सन ॲन्ड टुब्रो यांनी बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेले १२ मजली इमारतीचे बांधकाम ९ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले असून यामुळे रेरा कायद्यातील वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या मानकाचेदेखील अनुपालन करण्यात आले आहे.
“मिशन ९६ च्या निमित्ताने नियंत्रित वातावरणात, मजला बांधणीचा कालावधी कमी करण्यासह कमी मनुष्यबळाच्या उपलब्धतेसह उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञान किती सक्षम आहे हे सिद्ध झाले आहे.”
प्रीकास्ट तंत्रज्ञान हे भविष्यात सर्वोत्तम गुणवत्तेसह नियंत्रित वातावरणात यांत्रिक पद्धतीने निवासी इमारतींचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. सदर बांधकामामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण (फिनिशिंग) करण्यासह अधिसंरचनेच्या (सुपरस्ट्रक्चर) १,९८५ प्रीकास्ट घटकांचे उत्पादन (प्रॉडक्शन) आणि प्रतिष्ठापन (इन्स्टॉलेशन) करणे आणि ६४,००० चौ. फुट बांधीव क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम विषयक कामे (एमईपी) करण्याचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.
गृहनिर्माणातील या यशासह सिडकोने नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो कुटुबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घरांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे.