Devendra Fadnavis: अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार

Devendra Fadnavis: महाराष्ट्राला नशामुक्त करण्यासाठी अमली पदार्थांच्या परिसंस्थेचे समूळ उच्चाटन करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हास्तरावरील कामगिरीचे नियमित मूल्यमापन करण्यात येणार आहे.
अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार
अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार
Published on: 
Updated on: 
  • नशामुक्त महाराष्ट्रासाठी अमली पदार्थांच्या परिसंस्थेचे समूळ उच्चाटन करणार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

  • जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार

मुंबई : तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि ‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टिकोनातून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. नशामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या काळात अमली पदार्थांच्या परिसंस्थेचे समूळ उच्चाटन करण्यावर भर देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. अंमली पदार्थांची वाढती परिसंस्था येत्या काळात समूळ नष्ट करीत देशाचे आणि पर्यायाने समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे. राज्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त महाराष्ट्र – लक्ष्यवेध १.०’ अभियानाचा शुभारंभ वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. (Devendra Fadnavis)

‘नशामुक्त महाराष्ट्र – लक्ष्यवेध १.०’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत असून, यासाठी शासनाच्या सर्व विभागांचा समन्वित सहभाग घ्यावा. विविध विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार
Indian Armed Forces: देशसेवेसाठी मुलींची 'गरुडझेप'; NDA मध्ये 'या' दोन मुलींनी घेतली उत्तुंग भरारी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या अभियानांतर्गत शासनाच्या सर्व विभागांचा समन्वित सहभाग असलेला सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. अंमली पदार्थांची निर्मिती करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नसल्याने जुन्या कारखान्यांमध्ये, घरांमध्ये किंवा छोट्या जागांमध्येही त्यांचे उत्पादन केले जात असल्याचे आढळते. या अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसा असल्यामुळे विविध यंत्रणांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होतात. विशेषतः १४ ते २४ वयोगटातील तरुणांचा अंमली पदार्थांच्या सेवनासाठी तसेच वितरणाच्या साखळीत वापर केला जात आहे. अल्प पैशांच्या आमिषाने तरुणांना या अवैध व्यवहारात ओढले जात आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

अंमली पदार्थांविरोधातील लढाई केवळ पोलीस विभागाच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच मागणी कमी करण्यासाठीही व्यापक उपाययोजना करणे आवश्यक आहे. पुरवठा साखळीतील विविध घटकांवर कारवाई करताना आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि जीएसटी विभागाची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अंमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची प्रभावी उभारणी आणि योग्य व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे आहे. पोलीस विभागासह संबंधित सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. या लढाईतील प्रत्येक विभागाचा सहभाग महत्त्वाचा असून, कोणतीही एक यंत्रणा कमकुवत ठरल्यास संपूर्ण प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील २० प्रशासकीय विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सहा प्रमुख स्तंभांवर आधारित २१ कृती मुद्दे निश्चित केले आहेत. जिल्हास्तरीय एनसीओआरडी (NCORD) समित्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी ४० निकष आणि एकूण ६५० गुणांची ‘परफॉर्मन्स मॅट्रिक्स फॉर डिस्ट्रिक्ट एनसीओआरडी’ निश्चित करण्यात आली आहे.

प्रत्येक विभागाच्या कामाचे नियमित मूल्यमापन झाल्यास उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, हे स्पष्ट होईल. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देता येईल, तर अपेक्षित कामगिरी न करणाऱ्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

प्रत्येक विभागाच्या कामाचे नियमित मूल्यमापन झाल्यास उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, हे स्पष्ट होईल. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देता येईल, तर अपेक्षित कामगिरी न करणाऱ्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पोलीस विभाग हा समाजाचे डोळे आणि कान म्हणून काम करतो. त्यामुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांबाबतची माहिती वेळेत मिळणे आणि त्यावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधीनस्थ यंत्रणांशी संवाद, नियमित देखरेख आणि कारवाईसाठी आवश्यक प्रशासकीय व नैतिक अधिकारांचा प्रभावी वापर याकडे विशेष लक्ष द्यावे. पोलीस महासंचालकांनी विभागांतर्गत दिलेल्या सूचना आणि निश्चित केलेल्या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

अंमली पदार्थांविरोधातील ही लढाई आपल्या मुलांच्या, पुढील पिढ्यांच्या आणि संपूर्ण समाजाच्या भवितव्यासाठी आहे. त्यामुळे सर्व विभागांनी गांभीर्याने आणि पूर्ण क्षमतेने या मोहिमेत सहभागी व्हावे. निश्चित केलेल्या मूल्यमापन निकषांचा वापर करून सर्व जिल्ह्यांनी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या, राज्याला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी अंमली पदार्थांचा पुरवठा आणि मागणी या दोन्ही बाजूंनी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नैसर्गिक व रासायनिक अंमली पदार्थांच्या उत्पादन आणि पुरवठा साखळीवर नियंत्रण, जनजागृती, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन यांना प्राधान्य देणारा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची आहे. राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेमध्येही ‘ड्रग फ्री’ हा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी ‘ड्रग फ्री व्हिलेज’चा ठराव घेऊन त्यासाठी जनजागृती करावी. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमाचाही अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी उपयोग करण्यात येणार आहे.

पोलीस महासंचालक सदानंद दाते म्हणाले, राज्यातील अंमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करण्यासाठी पोलीस विभागाने सर्व जिल्हे आणि पोलीस आयुक्तालयांसाठी एकसमान कृती आराखडा तयार केला असून, प्रभावी तपास, दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, अंमली पदार्थांच्या तस्करीतील आर्थिक व्यवहारांचा तपास, गुन्हेगारी नेटवर्कच्या साखळीचा शोध आणि आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार
वाशिममध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, जलसंधारण कामांना गती द्या; पाणीटंचाईवर पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश