

कराड : शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून मोठ्या संधी निर्माण करणारे क्षेत्र म्हणून पाहण्याची गरज आहे. युवा पिढीने कृषी क्षेत्रातील स्टार्टअप, अन्नप्रक्रिया उद्योग, आधुनिक पशुपालन आणि कृषी निर्यात या क्षेत्रांत पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
कराड येथे आयोजित २१ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि. २५) सकाळी फीत कापून करण्यात आले. त्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण, महात्मा ज्योतिबा फुले, सुधाकरराव नाईक, विलासराव पाटील-उंडाळकर आणि स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले यांनी तर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांचा सत्कार उपसभापती नितीन ढापरे यांनी केला.
यावेळी खासदार नितीनकाका जाधव (पाटील), सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, युवा नेते आदिराज पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, कराड बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहते. तसेच आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा यांच्या वतीनेही वंदन करते. कराडच्या या ऐतिहासिक भूमीत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित राहताना मनापासून आनंद होत आहे. येथे येण्यापूर्वी प्रीतिसंगमावर चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने काम करण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. प्रीतिसंगम हा केवळ कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम नसून महाराष्ट्राच्या विचारांचा, संस्कारांचा आणि विकासाच्या दूरदृष्टीचा संगम आहे.
यशवंतराव चव्हाणांनी केली आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला केवळ राजकीय नेतृत्व दिले नाही, तर आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी केली. शेती, सहकार, शिक्षण, उद्योग, ग्रामीण विकास आणि सामाजिक सलोखा या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने काम केले. ग्रामीण भागातील माणूस सक्षम झाला पाहिजे, शेतकऱ्यांना बळ मिळाले पाहिजे आणि गावागावांत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे, हा त्यांचा विचार कायम होता. त्यांच्या हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी २१ वर्षापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हे कृषी प्रदर्शन सुरू करून चव्हाण साहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केल्याचे त्या म्हणाल्या.