
ठाणे : ठाणे शहराच्या नौपाडा भागातील गावदेवी मंदिर (Gavdevi Mandir) हे ठाणेकर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यंदा गावदेवी मंदिराची स्थापना होऊन १०६ वर्ष पूर्ण होत आहेत. येथील ग्राम देवतेची सुबक मूर्ती ही भाविकांना आकर्षित करीत असून नवरात्रोत्सवकाळात ठाणे जिल्ह्यातील (Thane District) हजारो नागरिक मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
१९१६ रोजी भंडारी समाजातील नारायण हिराजी वारे यांनी गावदेवी मंदिराची स्थापना केली. संकटांपासून आपल्या गावाचे आणि शहराचे रक्षण व्हावे यासाठी भंडारी समाजाकडून देवीची स्थापना ठाणे पूर्व येथे करण्यात आली होती. सध्या नौपाडा भागात असणारे देवीचे मंदिर काही वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ येथे होते. कालांतराने ठाणे शहराचा विस्तार झाल्याने रेल्वे स्थानकाची जागा अपुरी पडू लागली. तेव्हा रेल्वे स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गोखले रोड नौपाडा (Naupada) येथे गावदेवी मंदिराची उभारणी करून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
२००१ मध्ये गावदेवी मंदिराच्या नवीन विश्वस्थ मंडळ तयार करण्यात आले. यात अध्यक्ष अशोक भट्टे, सरचिटणीस भालचंद्र वारे, खजिनदार विजय साळुंखे यांचा विश्वस्थ मंडळात समावेश करण्यात आला. मुख्य विश्वस्थांनी जुनी झालेल्या मंदिराच्या वास्तूची पुनर्रबांधणी करण्याचा चंग बांधला. वर्तमानातील सुधारणा केलेली मंदिराची वास्तू गावदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न करते. मंदिरात गावदेवी सह दगडात कोरलेल्या सेवकांच्याही मुर्त्या आहेत. दरवर्षी गावदेवी मंडळाकडून भाविकांना स्वतः देवीची ओटी भरण्याची परवानगी दिली जाते त्यामुळे नवरात्रोत्सवात महिलांची मंदिराबाहेर मोठी रांग पाहायला मिळते. गावदेवी ही भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी येथे येणाऱ्या भक्तांची आस्था आहे.
उपक्रम :
मंदिरात दरवर्षी शारदोत्सव, चैत्रोत्सव, पौषपोर्णीमा हे तीन मोठे उत्सव साजरे केले जातात. नवरात्रीचे नऊ दिवस मंदिरात होणारे होम हवन, पूजा, भजन किर्तन, इत्यादींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. गावदेवी मंदिर विश्वस्थ मंडळ धार्मिक कार्यासोबत सामाजिक कार्यातही हातभार लावत असते. रक्तदान, आरोग्य तपासणी, पुस्तक दान असे अनेक उपक्रम करून मंडळाकडून सामाजिक बांधिलकीही जपली जाते.