
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील पहिला सवयी विकसित करणारा वेलनेस प्लॅटफॉर्म असलेल्या हॅबिल्डने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठत आपल्या नावावर आठवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. एका दिवसात सर्वाधिक ऑनलाइन योग सत्र पाहणाऱ्यांचा विक्रम हॅबिल्डने अधिकृतपणे प्रस्थापित केला असून, या विक्रमाला वर्ल्ड रेकॉर्ड्स युनियनची मान्यता मिळाली आहे. दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या सहा लाइव्ह ऑनलाइन योग सत्रांद्वारे तब्बल ९.३ लाख व्यक्तींनी सहभाग घेतला आणि हा विक्रम साकार झाला.
हा उपक्रम हॅबिल्डच्या ‘हर घर योगा’ अभियानाअंतर्गत राबविण्यात आला. नववर्षाच्या सुरुवातीला आरोग्य सुधारण्याचे, नियमित व्यायाम करण्याचे आणि मानसिक शांतता राखण्याचे संकल्प बहुतांश लोक करतात. मात्र, जानेवारीचा मध्य येईपर्यंत अनेक जण हे संकल्प सोडून देतात. म्हणूनच जानेवारी महिन्यातील दुसरा शुक्रवार ‘क्विटर्स डे’ म्हणून ओळखला जातो. हॅबिल्डने याच दिवशी हा जागतिक विक्रम रचत, संकल्प टिकवून ठेवण्याचा सकारात्मक संदेश दिला.
या विक्रमाच्या निमित्ताने हॅबिल्डने एक सामाजिक उपक्रमही जाहीर केला आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नवीन सदस्यासाठी शाळा उभारणीसाठी एक विट दान करण्यात येणार आहे. हा उपक्रम हॅबिल्डच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असून, आरोग्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना हॅबिल्डचे सह-संस्थापक व योग शिक्षक सौरभ बोथरा म्हणाले, “हा दिवस केवळ विक्रमाचा नव्हता, तर लाखो लोकांना त्यांच्या आरोग्याकडे पुन्हा लक्ष देण्याची प्रेरणा देणारा ठरला. मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्यास सातत्य राखणे अधिक सोपे होते. ‘हर घर योगा’ उपक्रमामुळे योग ही दैनंदिन सवय बनत असून, आमच्या समुदायाचा सेवाभाव यामधून अधोरेखित होतो. त्यामुळेच आम्ही माझ्या वडिलोपार्जित गावात शाळा उभारण्याची घोषणा केली आहे.” या उपक्रमाची खास बाब म्हणजे, लोकांना अवघड किंवा दीर्घ योगसत्र करण्याऐवजी सोप्या पद्धतीने सुरुवात करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. परिपूर्णतेपेक्षा नियमित उपस्थितीला महत्त्व देण्यात आले. एखादा दिवस योग न झाल्यास ते अपयश न मानता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या सत्रांतून मांडण्यात आला.
विशेष म्हणजे, या विक्रमात ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यावरून हॅबिल्डचा समुदाय सर्व वयोगटांमध्ये नियमित व सौम्य योग सरावाला प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट होते. सातत्याने केलेला साधा योगदेखील आयुष्यभराची सवय ठरू शकतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. एकूणच, हॅबिल्डसाठी हा दिवस केवळ विक्रमाचा नसून, दररोज योग, उत्तम आरोग्य आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे. भविष्यातही लोकांना दैनंदिन जीवनात योग अंगीकारण्यासाठी प्रेरित करण्याचा हॅबिल्डचा संकल्प कायम राहणार आहे.