Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत मविआ सरकार येणार; सर्व्हेनुसार काँग्रेसला ८५ जागांवर अनुकूल परिस्थिती
राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान अघईड आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. मात्र यंदाची निवडणूक काँग्रेस पक्षाला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून एक अंतर्गत सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे . लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १३ जागांवर विजयी झाला होता. यंदा महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिली. लोकसभेत चांगले कमबॅक केल्यानंतर काँग्रेसने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अंतर्गत सर्व्हे केला आहे. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमुळे कॉग्रेसच्या ८० ते ८५ जागा येण्याचा अंदाज आहे. तर सर्वात कमी ३० ते ३५ जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ५० ते ६० जागा मिळू शकतात. तर ठाकरे गटाला ३० ते ३५ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
या सर्व्हेमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर महायुतीला केवळ १०० ते १२० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. मुंबईतील जागावाटपाचा तिढा महाविकास आघाडीला अजूनही सोडवता आलेले नाहीये. तर महायुतीमध्ये अजून कोणाला किती जागा व कोणत्या जागा मिळणार हे निश्चित झालेले नाही. कागलची जागा जवळपास अजित पवारांकडे जाण्याचे निश्चित असल्याने भाजपचे संमरजीत घाटगे यांनी तुतारी निशाण हातात घेण्याचे ठरवले आहे. तसेच इंदापूरचे जागा देखील अजित पवारांकडे गेल्यास हर्षवर्धन पाटील देखील वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता आहे.