फोटो सौजन्य- सोशल मिडीया
जालन्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. जालन्यात एका भरधाव टेम्पोने चौघांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये एक महिला, लहान मुलगी आणि एका जेष्ठ नागरिकाचा समावेश आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जालन्यातील मंठा परिसरात हा अपघात झाला. या अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
हेदेखील वाचा- राज्यात पावसाचा जोर ओसरला; रायगड आणि रत्नागिरीला आज हवामान विभागाचा यलो अलर्ट
जालना जिल्ह्यातील मंठा परिसरातील देवी रोड येथे एका टेम्पो चालकाने चौघांना धडक दिल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एका लहान मुलीसह तिघांचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगी जखमी झाली आहे. सीमा चव्हाण (वय २४), मारिया पठाण (वय ६) आणि रूपला राठोड (वय ६५) अशी या अपघातातील मृतांची नावं आहे. तर 4 वर्षांची चिमुकली इशिका चव्हाण या अपघातात जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघातामुळे मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.
हेदेखील वाचा- सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; गाडीचा झाला चक्काचूर
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालायत दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील मंठा शहरातील देवी रोडवर आज सकाळी एक महिला आपल्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात होती. यावेळी एक जेष्ठ नागरिक आणि सहा वर्षीय मुलगी देखील त्याच रस्त्याने जात होते. यावेळी या मार्गावरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने या चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात सीमा चव्हाण (वय २४), मारिया पठाण (वय ६) आणि रूपला राठोड (वय ६५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार वर्षाची चिमुकली इशिका चव्हाण गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे. अपघातग्रस्त टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
जालन्यात बस आणि कारचा देखील भीषण अपघात झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील सिंदखेडराजा चौफुली येथे हा भीषण अपघात झाला. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस हिंगोलीहून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी सिंदखेडराजा चौफुलीजवळ पाठीमागून येणाऱ्या एका कारने बसला धडक दिली आणि बस उलटी झाली. या अपघातात बसमधील ६ प्रवासी आणि कारमधील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.