अजित पवार यांची बजेट 2024 वर प्रतिक्रिया
मुंबई : आज प्रत्येक देशवायिसांचे लक्ष लोकसभेकडे लागले आहे. लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु असून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा लागलेल्या होत्या. नीर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पामध्ये आंध्रप्रदेश व बिहारसाठी विविध योजना व निधी जाहीर केला. मात्र महाराष्ट्रासाठी काही खास योजना केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे विरोधकांमध्ये नाराजी असली तरी देखील राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी बजेटवरुन मोदी सरकारचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत- विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या कष्टवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा भावना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
विश्वशक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प
अजित पवार यांनी पुढे मोदी सरकाराला धन्यवाद मानले. ते म्हणाले, मी एनडीए सरकारचे धन्यवाद मानतो की त्यांनी बजेटच्या माध्यमांतून देशवासियांचा विश्वास दृढ केला. देशाला विकसित राष्ट्र आणि विश्वशक्ती बनवण्याचं नरेंद्र मोदी व एनडीए सरकारचं स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शेती व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची केलेली तरतूद महत्त्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत 5 वर्षांसाठी वाढवत आली आहे. त्यामुळे देशातील 80 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा मिळाली आहे.” अशा शब्दांत अजित पवार यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे मोठे कौतुक केले.