Malegaon Sugar Factory Elections: बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचं राजकारण चांगलं तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी चंद्रराव तावरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. कारखान्याची निवडणूक जिंकल्यास आपणच चेअरमन असू, असं सांगून अजित पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. इतकेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी, “मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?” असा प्रश्न विचारत थेट ८५ वर्षांचे विरोधक चंद्रराव तावरे यांना आव्हान दिलं. अजित पवार यांच्या या आव्हानावर आता चंद्रराव तावरे यांनी उत्तर दिलं आहे.
चंद्रराव तावरे यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी, पोस्टर लावले आहेत. अनेकांनी व्हाट्सअप वर स्टेटस ठेवल्याचे दिसत आहे. या पोस्टर्स आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून अजित पवारांनाही एक संदेश देत त्यांचे आव्हान स्वीकारल्याचे दिसत आहे. “बडी से बडी हस्ती मिट गयी हमे झुकाने में बेटा तू तो कोशिश भी मत करना तेरी उमर गुजर जायेगी हमे गिराने में…”
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी होत आहे. एकूण १९,७५० सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी २१ जागांसाठी तब्बल ९० उमेदवार रिंगणात आहेत. सध्या कारखान्याचे नियंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘श्री नीळकंठेश्वर’ पॅनलकडे आहे.
पूर्वी १९९७ आणि २०१५ या दोन निवडणुकांमध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वातील पॅनलने कारखान्याचा कारभार सांभाळला होता. यंदाच्या निवडणुकीतही चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे ‘सहकार बचाव शेतकरी’ पॅनलच्या माध्यमातून जोरदार मैदानात आहेत.
अजित पवार यांच्या ‘श्री नीळकंठेश्वर’ पॅनलला राष्ट्रवादीचे अधिकृत पाठबळ आहे, तर ‘सहकार बचाव शेतकरी’ पॅनलला शरद पवार यांच्या विचारसरणीचा आधार असून त्यासोबत ‘बळीराजा पॅनल’, ‘कष्टकरी शेतकरी पॅनल’ आणि काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरीदेखील, यावेळी मुख्य संघर्ष हा ‘श्री नीळकंठेश्वर’ आणि ‘सहकार बचाव शेतकरी’ या दोन पॅनल्समध्येच असल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक राजकारणात आणि सहकार चळवळीत मोठा संदेश देणारी ठरण्याची शक्यता आहे.