NCP Leaders
पुणे : राष्टवादी काॅंग्रेसच्या साहेब गटाने आता ‘मी शरद मित्र’ या नावाने सदस्य नाेंदणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तळ्यात-मळ्यात असणाऱ्या कार्यकर्त्यांची काेंडी हाेणार आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दादा गटाकडून नवीन शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. साहेब आणि दादा या दाेन्हींवर निष्ठा असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काेणासाेबत जायचे या संभ्रमात अजूनही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आहेत. या पार्श्वभूमीवर साहेब गटाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे शहरात शरद पवार यांच्यासोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘मी शरद मित्र’ या नावाखाली सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘शरद मित्र अभियान’
राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते या अभियानाची सुरूवात होणार आहे. या अभियानामार्फत पुणे शहरातील नक्की किती कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र जळवपास स्पष्ट होणार आहे.
शरद पवारांनी निर्माण झालेला संभ्रम दूर करावा
दरम्यान, यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होऊ लागली आहे. यावरून आता शरद पवारांनी निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर आता ठाकरे आणि काॅंग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करून दिली आहे.