गृहनिर्माण संस्थांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय; पुनर्विकासाचा मार्ग होणार सुकर

मुंबईतील शासकीय जमिनीवरील ११३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना रेडी रेकनरच्या केवळ ५ टक्के अधिमूल्याने वर्ग-१ मालकी हक्क मिळणार आहेत. या निर्णयामुळे ६,२५० सदनिकांमधील सुमारे २५ हजार रहिवाशांना पुनर्विकासाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
CM Devendra Fadnvavis Mumbai Housing Society Redevelopment decision.jpg
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे (फोटो सौजन्य - AI)
Published on: 
Updated on: 
  • शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्कामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

  • नागरी निवारा परिषदेअंतर्गत गृहनिर्माण संस्थांना वर्ग-1 रूपांतरण आदेशांचे वितरण

Mumbai News : मुंबई : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्याने भोगवटादार वर्ग-1 दर्जा देऊन मालकी हक्क देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास सुलभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-1 रूपांतरण आदेश वितरित करण्यात आले. सुमारे 62 एकरांवरील या वसाहतीत 113 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील 6 हजार 250 सदनिका आणि 25 हजार रहिवाशांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे या सदस्यांना मालकी हक्क मिळून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्य शासनाने २०१७-१८ मध्ये कायद्यात बदल करून भाडेपट्ट्यावरील जमिनी वर्ग-१ करण्याची व्यवस्था निर्माण केली. सुरुवातीला २५ टक्के आणि त्यानंतर १० टक्के अधिमूल्य आकारण्यात येत होते. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेऊन पाच टक्के अधिमूल्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने एकमताने मान्य केला. अधिमूल्य कमी केल्यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना लाभ होईल. राज्य शासनाने स्वयं-पुनर्विकासासाठी विविध सवलती दिल्यामुळे मुंबईत सुमारे 1 हजार 600 प्रस्ताव पुढे आले असून शासनाने त्यासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील शासकीय जमिनीवरील अन्य सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही वर्ग-1 रूपांतरणाचा लाभ देण्यासाठी महसूल विभागाने व्यापक मोहीम राबवावी, संस्थांच्या परिसरात शिबिरे घेऊन नागरिकांना आवश्यक मदत करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

उंच इमारती आणि टॉवरमधील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मालकी हक्क अधिक स्पष्ट होऊन एकच सदनिका एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे, सर्वसामान्यांना उत्तम जीवनमान मिळाले पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून वांद्रे परिसरात ‘सक्षम’ योजनेअंतर्गत कौशल्य गणना करण्याच्या अभिनव उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या माध्यमातून तरुणांना रोजगार देणाऱ्यांसोबत जोडून देण्याचे महत्त्वपूर्ण काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार बाजारपेठेच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीची संधी देणारे हे प्रारूप राज्यातील अन्य भागांतही राबविता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्द येथील जागा देण्यात येत आहे. या जागेमध्ये मराठी चित्रपटांना सवलत द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना केली. त्याचप्रमाणे ड्रग्ज फ्री मुंबई करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करुन आपण एकत्रित प्रयत्नांतून ‘ड्रग्ज’ला पराभूत करू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेनुसार मुंबईतील नागरिकांच्या घरांना कायदेशीर आणि शाश्वत मालकी हक्क देण्यासाठी शासनाने नियम अधिक सुलभ केले आहेत. पाच टक्के अधिमूल्याच्या निर्णयामुळे नागरी निवारा परिषदेतील कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांच्या घरांच्या पुनर्विकासाला चालना मिळेल. मुंबईतील पात्र गृहनिर्माण संस्थांपर्यंत ही मोहीम व्यापक स्वरूपात पोहोचविण्यात येईल, असे सांगून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची घरे कायदेशीर करून त्यांची मालमत्ता शाश्वत करण्यासाठी महसूल, सहकार आणि नगरविकास विभाग समन्वयाने काम करत आहेत."

Q

मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क मिळवण्यासाठी किती अधिमूल्य भरावे लागणार आहे?

A

वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ ५ टक्के अधिमूल्य भरून भोगवटादार वर्ग-१ दर्जा आणि मालकी हक्क मिळवता येणार आहे.

Q

राज्य सरकारच्या या निर्णयाचा किती गृहनिर्माण संस्थांना फायदा होणार आहे?

A

नागरी निवारा परिषदेअंतर्गत ६२ एकर परिसरातील ११३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. यामध्ये ६ हजार २५० सदनिका असून सुमारे २५ हजार रहिवाशांना फायदा मिळणार आहे.

Q

वर्ग-१ मालकी हक्क मिळाल्यामुळे घरमालकांना काय फायदा होणार आहे?

A

मालकी हक्क मिळाल्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच घरांच्या मालकीबाबतचे अधिकार अधिक स्पष्ट होतील.