26/11 Terror Attack : मुंबईवरील हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण; समुद्रात नौदल, तटरक्षक दलाचा कडक पहारा

समुद्रात नौदल आणि तटरक्षक दलाकडून गस्त तीव्र करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत.
मुंबईत हाय अलर्ट; समुद्रात नौदल, तटरक्षक दलाचा कडक पहारा
मुंबईत हाय अलर्ट; समुद्रात नौदल, तटरक्षक दलाचा कडक पहारामुंबईत हाय अलर्ट; समुद्रात नौदल, तटरक्षक दलाचा कडक पहारा
Published on: 
Updated on: 

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला असून, समुद्रात नौदल आणि तटरक्षक दलाकडून गस्त तीव्र करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत.

ताज महाल पॅलेस हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, नरीमन हाउस, सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली आणि माहिम दर्गा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एचपीसीएल, बीपीसीएल रिफायनरी आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या परिसरातही गस्त आणि वाहनांची तपासणी वाढवण्यात आली आहे. प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांची चौकशी केली जात आहे. तसेच समुद्रमार्गे दहशतवादी घुसखोरी होऊ नये, यासाठी अरबी समुद्रात गस्त वाढविण्यात आली आहे. मच्छीमार नौकांसाठी 24 तास ट्रेकिंग, बायोमेट्रिक कार्ड आणि ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. जीपीएस जॅमिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षाही सतर्क ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, २६/११ च्या हल्ल्यात सीएसएमटी स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५८ जणांचा मृत्यू, तर १०४ जण जखमी झाले होते. तरीही स्थानकाच्या प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर आणि बॅगेज स्कॅनर नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणची सुरक्षा उपकरणे बंद किंवा ठकाणची सुरक्ष निकामी असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दररोज सुमारे पाच लाख प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सदानंद दाते आता महाराष्ट्राचे पोलीसप्रमुख

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्याशी शौर्याने मुकाबला करणारे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी विराजमान झाले आहेत. कामा रुग्णालयात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ग्रेनेड हल्ल्यात जखमी होऊनही त्यांनी माघार घेतली नव्हती. त्यांच्या प्रतिकारामुळे दहशतवाद्यांना पळ काढावा लागला. विशेष म्हणजे, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक असताना दाते यांच्या नेतृत्वाखालीच २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.