भाईंदर/ विजय काते :-मिरा-भाईंदरमधील काशीगाव मेट्रो स्थानकाच्या उभारणीसाठी महत्त्वाची ठरलेली आणि वादग्रस्त ठरलेली भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘सेवेन इलेव्हेन’ कंपनीच्या मालकीची जागा तात्काळ महापालिकेला हस्तांतर करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या विकास आराखड्यात ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी आणि सेवारोडसाठी आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, आमदार मेहतांच्या कंपनीने चालू बाजारभावानुसार मोबदला मागितल्यामुळे महापालिकेवर २३ ते ३० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार होता. त्यामुळे जागा ताब्यात घेण्याचा प्रश्न रखडला होता.
या वादामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या मूळ आराखड्यात बदल करून जिन्याचे स्थान नाल्यावर हलवले. परंतु, कंपनीने नाल्यावरील १३३ मीटर जागाही आपली असल्याचा दावा करत काम थांबवले, ज्यामुळे प्रकल्प दोन वर्षांहून अधिक काळ रखडला.
बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मेट्रो चाचणीसाठी मिरा-भाईंदर येथे आले होते. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या वादाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर फडणवीस यांनी आमदार नरेंद्र मेहतांना जागा त्वरित महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या.
या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनीही सकारात्मक भूमिका घेत “मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२२ मध्येही क्रेडिट नोट किंवा इतर पर्यायाने जागा हस्तांतर करण्याचे सांगितले होते. त्यांच्या आदेशाचे पालन करत मी नागरी हितासाठी सकारात्मक पाऊल उचलणार आहे,” असे स्पष्ट केले.आमदार नरेंद्र महेता यांनी केले आहेया निर्णयामुळे काशीगाव मेट्रो स्थानकाचा रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची आणि स्थानिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.