साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
साहित्यिक अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सुरुवातीला संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.