

कारमधून मुलीला नेले, कुटुंबीयांनी केला पाठलाग
गुन्हा दाखल करण्यास दीड दिवसाचा विलंब
कार सोडल्याचा आणि संशयितांना मोकळे केल्याचा आरोप
Nagpur News: जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलीला दोन तरुणांनी कारमधून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला फूस लावून कारमध्ये बसवून ड्रॅगन पॅलेसच्या दिशेने नेण्यात आले.
दरम्यान, कुटुंबीयांनी कारचा पाठलाग केला; मात्र चालकाने रिक्षाला कट मारून पळ काढला. काही वेळानंतर मुलगी स्वतःहून घरी परतली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दीड दिवसाचा विलंब झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुलीचे वडील कामानिमित्त मोटर स्टँड चौकात गेले होते. त्याचवेळी त्यांच्या साळ्याने फोन करून मुलगी एका कारमधून जात असल्याची माहिती दिली.
वडिलांनी तातडीने रिक्षातून घटनास्थळी धाव घेत कारचा पाठलाग सुरू केला. मात्र, खलासी लाइन परिसरात कारचालकाने रिक्षाला कट मारला आणि कार घेऊन पळ काढला. काही वेळानंतर मुलगी घरी परतली. विचारपूस केल्यानंतर विजय आणि त्याच्या साथीदाराने तिला कारमधून ड्रॅगन पॅलेसच्या दिशेने नेल्याचे तिने सांगितले.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणे शक्य नसल्याचे सांगून त्यांना शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यानंतर दिवसभर चौकशी सुरू राहिली.
शनिवारी पहाटे कुटुंबीयांना गुन्ह्याची प्रत देण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी दीड दिवसाचा विलंब करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात विजय विक्रम लक्षणे (२१, रा. मच्छीपूल, कामठी) आणि करण संजू गटलेवार (२१, रा. येरखेडा) यांची संशयित म्हणून नावे समोर आली आहेत.
पीडितेच्या आजोबांनी या प्रकरणात एका महिलेचा दबाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे. संबंधित कार त्या महिलेची असून विजय तिच्याकडे चालक म्हणून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी सोडून दिली, तसेच दोन्ही संशयितांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने आणि निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.