Nagpur News : एमबीबीएसची बनावट पदवी; ChatGPT चा वापर, ६ महिने जीएमसीत डॉक्टर म्हणून नोकरी

नागपुरात ChatGPT च्या मदतीने एमबीबीएसचे बनावट प्रमाणपत्र तयार करून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी मिळवल्याचा प्रकार उघड झाला आहे. सुमंत सावरकर याने ६० हजार रुपये घेऊन चंदा वानखेडेला बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप असून दोन्ही आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
फोटो सौजन्य AI
Nagpur Medical scam Newsफोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • ChatGPT च्या मदतीने बनवले MBBS चे बनावट प्रमाणपत्र

  • सहा महिने जीएमसीमध्ये डॉक्टर म्हणून काम

  • पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकार उघड

Nagpur News : नागपुरात बनावट एमबीबीएस पदवीच्या आधारे सरकारी रुग्णालयात नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या बनावट प्रमाणपत्रासाठी चक्क ChatGPT चा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

चंदा वानखेडे या महिलेने जीएमसीमध्ये तब्बल सहा महिने बोगस डॉक्टर म्हणून काम केले. सुमंत सावरकर याने ६० हजार रुपये घेऊन तिला बनावट एमबीबीएस प्रमाणपत्र तयार करून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रातील कागदपत्र पडताळणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ChatGPT च्या मदतीने बनवले MBBS चे बनावट प्रमाणपत्र

या प्रकरणातील आरोपी सुमंत सावरकर (४२) हा मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालवतो. त्याने ChatGPT च्या मदतीने एमबीबीएस पदवीचे बनावट प्रमाणपत्र आणि अंतिम वर्षाची गुणपत्रिका तयार करून दिल्याची कबुली पोलिस चौकशीत दिल्याचे समोर आले आहे.

यासाठी त्याने चंदा वानखेडे हिच्याकडून ६० हजार रुपये घेतले होते. विशेष म्हणजे, बनावट प्रमाणपत्रावर दुसऱ्याच डॉक्टरचा वैद्यकीय नोंदणी क्रमांक टाकण्यात आला होता. या कागदपत्रांच्या आधारे चंदाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोकरी मिळवली.

फोटो सौजन्य AI
Nagpur News : रायझिंग नागपूरसाठी विकासाचा महाआराखडा; ४०० गुंतवणूकदार येणार; चेहरामोहरा बदलणार

सहा महिने जीएमसीमध्ये डॉक्टर म्हणून काम

चंदा वानखेडे हिची शरीरक्रियाशास्त्र विभागात ३६४ दिवसांसाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागेवर तिची नियुक्ती झाली होती. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या शिफारशीनंतर तिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथून एमबीबीएस पदवी घेतल्याची कागदपत्रे सादर केली होती.

मात्र, जीएमसी प्रशासनाकडून अंतर्गत पडताळणी सुरू असताना तिच्या वैद्यकीय नोंदणी क्रमांकाची तपासणी करण्यात आली. हा क्रमांक दुसऱ्याच डॉक्टरच्या नावावर असल्याचे उघड झाले. त्यानंतर प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकाही बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

फोटो सौजन्य AI
Nagpur News : पुणेरी बाकरवडीचा नागपुरी फ्लेक्सला ठसका; मजेशीर जुगलबंदी

पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकार उघड

जीएमसीच्या अधिष्ठात्यांनी याप्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान चंदा वानखेडे हिने सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर तिने सुमंत सावरकर याला ६० हजार रुपये देऊन प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी सुमंतला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ChatGPT च्या मदतीने बनावट प्रमाणपत्र तयार केल्याची कबुली दिल्याचे समोर आले. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांचा वापर करून वैद्यकीय सेवेत प्रवेश मिळवण्याच्या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधले गेले आहे.