महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार परिसरात महानगरपालिकेकडून ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या योजनेला कापड बाजार व्यापारी असोसिएशनने कडाडून विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या हरकतींकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन, तसेच न्यायालयात धाव घेण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
कापड बाजार हा शहराचा हृदयभाग असून येथे दररोज हजारो ग्राहकांची वर्दळ असते. महापालिकेने या भागात ‘पे अँड पार्क’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल आणि व्यापारावर परिणाम होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुनावणीविना निर्णय: व्यापाऱ्यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्तांकडे लेखी हरकत नोंदवली होती. मात्र, त्यावर कोणतीही कायदेशीर सुनावणी न घेता महापालिका प्रशासन ही योजना रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
ग्राहकांची अडचण: सशुल्क पार्किंगमुळे ग्राहक या भागात येण्याचे टाळतील, ज्याचा थेट फटका बाजारपेठेतील उलाढालीला बसेल.
व्यापाऱ्यांची भूमिका: व्यापाऱ्यांनी आधीच अनेक समस्यांना तोंड दिले आहे, त्यात ‘पे अँड पार्क’मुळे आणखी एक डोकेदुखी वाढू नये, अशी त्यांची मागणी आहे.
“आम्ही या योजनेला आधीच लेखी हरकत दिली आहे. प्रशासनाने त्यावर कोणतीही सुनावणी घेतलेली नाही. जर महापालिकेने जबरदस्तीने ‘पे अँड पार्क’ लागू करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. वेळप्रसंगी आम्ही न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू, पण व्यापाऱ्यांवर आणि ग्राहकांवर हा अन्याय होऊ देणार नाही”, अध्यक्ष, कापड बाजार व्यापारी असोसिएशन ईश्वर बोरा यांनी माहिती ईश्वर बोरा यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास संपूर्ण कापड बाजार बंद ठेवून निषेध व्यक्त करण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. आता या वादावर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘कुठल्याही पक्षाचे खासदार फोडणे सोपे नाही’; ‘ऑपरेशन टायगर’वर अनिल देशमुख यांचं मोठं विधान






