अमरावती : मेडीकल संचालक उमेश कोल्हे (Medical Director Umesh Kolhe) हत्या प्रकरणात (murder case) पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आणखी एक व्हिडिओ (video) मिळाला असून ५४ सेकंदाच्या (54 seconds) या व्हिडिओमध्ये ३ आरोपी उमेश कोल्हे यांना थांबवताना आणि गुडघ्यावर बसवून हल्ला करताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या आधारे पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान एनआयएचे पथक (Squad of NIA) आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एनआयएचे पथक आरोपींच्या ताब्याकरिता लगणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कोतवालीत होते. एनआयएचे डीआयजी विक्रम खलारे (NIA DIG Vikram Khalare), एएसपी प्रवीण हिंगवटे (ASP Praveen Hingwate), अधिकारी बनसोड (Officer Bansod ) यांचा समावेश असलेले पथक या प्रक्रियेच्या पुर्ततेसाठी प्रयत्नशील असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
५४ सेकंदाचे सीसीटीव्ही फुटेज
या प्रकरणाशी संबंधित आणखी एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज पाहून उमेश कोल्हे यांना आरोपींनी आधी गुडघे टेकवायला लावले, नंतर चाकूने त्यांचा गळा चिरला, असा अंदाज वर्तवला जात आहे. नवीन सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या व्हिडिओत आरोपींनी उमेश कोल्हे यांना घंटाघर गल्लीत घेरले आणि पकडल्यानंतर जबरदस्तीने जमिनीवर गुडघे टेकवले आणि नंतर धारदार चाकूने त्यांचा गळा चिरल्याचे समजते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ३ ते ४ आरोपी घटनास्थळी दिसत आहेत. मात्र हे व्हिडिओ फुटेज खूपच अस्पष्ट आहे. त्यामुळे पोलिसांनी हा व्हिडीओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.
आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी उमेश कोल्हे यांचा चाकुने एका झटक्यात गळा चिरून घटनास्थळावरुन पळ काढल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र हे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नवा अँगल पुढे आला आहे. सीसीटीव्ही फुटेज सुमारे ५४ सेकंदाचे असून, त्या दरम्यान आरोपी कुठेही घाईत दिसले नाही. घंटाघर गल्लीला लागून असलेल्या श्याम चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहनांची ये-जा सुरू होती, मात्र याकडे आरोपींनी पूर्णपणे दुर्लक्ष केले, तर मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या कोणाचेही या घटनेकडे लक्ष गेले नाही.
एनआयएने स्वतंत्र एफआयआर नोंदवला
उमेश कोल्हे हत्येतील सातही आरोपींचा ताबा स्थानिक न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला. एनआयएचे पथक आरोपींना मुंबईला घेऊन जाणार असून, तेथे आरोपींना ८ जुलै रोजी कोर्टात हजर केले जाणार आहे. एनआयएने आरोपींविरुद्ध मुंबईत स्वतंत्र एफआयआर नोंदवला आहे. ज्यामध्ये आरोपी विरुद्ध भादवि ३०२, ३४, १०९, १२०(५). २०१,१५३(७), १५३ से. (ब). २९५ (अ) अंतर्गत नियोजनबद्ध पद्धतीने हत्येचा कट रचल्याचा गुन्हा या कलमान्वये नोंदविण्यात आला.