मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर पक्षात फूट पडली. त्यांच्याकडे पक्षातला मोठा गट असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शरद पवारांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. याचदरम्यान शरद पवारांना सोडून सत्तापक्षात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
शरद पवारांचा स्वाभिमान दौरा महाराष्ट्रभर
शरद पवारांनी राज्यभरात स्वाभिमान दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात पहिली सभा येवल्यात झाली होती. दुसरी सभा बीडमध्ये झाली तर उद्या तिसरी सभा कोल्हापुरात होत आहे. पवारांची भंडाऱ्यातदेखील सभा होऊ शकते. प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात सभा झाली, तर स्वतः प्रफुल्ल पटेल पवारांच्या स्वागताला जाणार आहेत.
प्रफुल्ल पटेलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पक्षात बंड झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल काल पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यामध्ये पोहोचले. त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवारांची भंडाऱ्यात सभा झाल्यानंतर त्या सभेला गर्दी झाली पाहिजे, कार्यकर्त्यांनी आवर्जून सभेला जावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या विधानाने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना टोमणा
प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की, शरद पवार हे जिल्ह्यात आले तर त्यांच्या स्वागतासाठी मी जाणार आहे. तुम्हीही या, आपण मिळून जावू आणि त्यांचे स्वागत करू. साहेबांच्या सभेसाठी आपल्याशिवाय कुणीही गर्दी करू शकत नाही आणि भाषणामध्ये माझ्याविरोधात बोलले तरी ऐकून घेऊ, असा टोमणा त्यांनी मारला.
प्रफुल्ल पटेलांच्या विधानामुळे आश्चर्य
प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जातात. शरद पवारांच्या सर्वच निष्ठावान आणि जुन्या नेत्यांनी भाजपशी घरोबा केला. त्यामुळे या बंडाविषयीच शंका उपस्थित केल्या जात आहे. तरीही शरद पवार ताकदीने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी उपरोधिकपणे टिपण्णी केल्याचे समजते.