

घरातील वाचनसंस्कारांतूनच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल; माधुरी मिसाळ
पुणे पुस्तक महोत्सवाच्या मंडप उभारणीला उत्साहात प्रारंभ
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची- मिसाळ
Pune Book Festival: मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. घरातच वाचनाचे संस्कार रुजल्यास मुलांना चांगली पुस्तके वाचण्याची आणि ज्ञानार्जनाची गोडी लागते. वाचनाची ही आवड पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्यातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १२ ते २० डिसेंबरदरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी मिसाळ यांच्या हस्ते झाला. या वेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सुशील जाधव, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.
Pune Book Festival: शांतता… पुणेकर वाचत आहेत’! 1 लाखांपेक्षा अधिक फोटोज..
मिसाळ म्हणाल्या, पुणे पुस्तक महोत्सवाला दरवर्षी पुणेकरांचा अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वाचन चळवळीला बळ मिळत असून, महोत्सवाचा विस्तारही वाढत आहे. युवा पिढीची महोत्सवातील उपस्थिती आणि दुर्मिळ पुस्तकांची उपलब्धता ही आनंदाची बाब आहे. पुस्तके ज्ञान समृद्ध करण्यासोबतच वाचनाची उत्सुकताही वाढवतात. 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमात आठ डिसेंबरला सर्वांनी सहभागी होऊन एक तास वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राजेश पांडे म्हणाले, यंदा महोत्सवातील २०० दालने प्रतीक्षायादीवर असून, विविध विषयांवरील २४ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. लिट फेस्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत नामांकित मान्यवर सहभागी होणार आहेत. आठ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत पाच लाख पुणेकर एकाच वेळी वाचन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बागेश्री मंठाळकर यांनी आभार मानले.
पुणे बुक फेस्टिव्हल हा पुण्यातील वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणारा मोठा पुस्तक महोत्सव आहे. या महोत्सवात विविध भाषांमधील पुस्तके, साहित्यिक, लेखक, प्रकाशक आणि वाचकांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळते. यंदा पुणे बूक फेस्टिवलचे तिसरे वर्ष असणार आहे. यंदा 12 ते 20 डिसेंबर दरम्यान पुण्यनगरीत एफसी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. तरी जास्ती जास्त वाचकांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची प्राथमिक जबाबदारी पालकांची आहे. घरातच वाचनाचे संस्कार रुजवल्यास मुलांना चांगली पुस्तके वाचण्याची आणि ज्ञानार्जनाची गोडी लागते, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
पुढच्या पिढीपर्यंत वाचनसंस्कृती पोहोचवण्यासाठी काय आवश्यक आहे?
लहानपणापासून मुलांना पुस्तकांची ओळख करून देणे, त्यांच्यासोबत वाचन करणे आणि घरात वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे.