
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील चार मिसिंग लिंक लवकरच जोडली जाणार; प्रस्तावही मंजूर
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने कोथरुड विधानसभा मतदारसंघावर कृपा दाखवली आहे. या मतदारसंघातील चार मिसिंग लिंक जोडण्यासाठी भूसंपादन करण्याचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेकडून मुख्य शहरासह उपनगरांमध्ये लहान मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. याशिवाय, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर उभारले जातात.
महापालिकेला रस्ते आणि प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादन करावे लागते. भूसंपादन करावयाच्या जागा शासकीय आणि खासगीही असतात. खासगी जागा मालकांना महापालिका एफएसआय व टीडीआर देऊन जागा ताब्यात घेतली. अनेकवेळा खासगी जागा मालक एफएसआय व टीडीआर नाकारून रोख मोबदल्याची मागणी करतात. बऱ्याचदा भूसंपादनाचा वाद न्यायालयात गेल्याने रस्ते रखडतात. शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना महापालिकेच्या पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्थायी समितीने प्रभाग क्र. 12 मधील कर्वे पुतळा पेट्रोल पंप ते मिलन कॉलनी डीपीतील 24 मीटर रस्त्या 195 मिसिंग लिंकसाठी चार जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी 45 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली. राजाराम पुल ते जावळकर उद्यान या दरम्यानच्या 36 मी. डीपी रस्ताच्या बाधित 19 मिळकतींना रोख मोबदला देण्यासाठी 50 कोटी रुपये आणि जावळकर उद्यान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यानच्या 30 मी. डीपी रस्त्याच्या बाधीत 15 मिळकतींना रोख मोबदला देण्यासाठी 15 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली.
कोथरूडमधील कृष्णाई कॉलनी ३० मी. डीपी. रस्त्यामधील २०० मी. जागेच्या भूसंपादनासाठी २.१० कोटी रुपये खर्चास आणि बालेवाडी गावठान येथील लक्ष्मी माता मंदीर ते ज्युपिटर हॉस्पिटल चौक या दरम्यानच्या 30 मी. डीपी रस्त्याच्या 1360 मी. लांबीच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी 73 कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे.