खेडशिवापूर / माणिक पवार : परदेशातून आलेले पर्यटक एका भारतीय फोटो ग्राफरसह पर्यटन करत असताना सिंहगड किल्ल्याच्या (Sinhgad Fort) खोऱ्यात भरकटले होते. राजगड आणि हवेली पोलिस तसेच पर्यटकांनी एकमेकांच्या शिट्याच्या आवाज देत जवळपास सात ते आठ किलोमीटर डोंगररांगामध्ये पायपिट केली. अवघ्या दोन तासांत भरकटलेल्या पर्यटकांचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, भरकटलेल्या फोटोग्राफर बेशुद्ध पडला होता.
घनश्याम मोतीलाल देसाई (वय 59 रा. अमेरिका (एनआरआय परदेशात रहिवाशी) आणि अभिषेक प्रमोद जैन (वय २३ रा. धुळे सध्या डांगे चौक, पुणे) असे डोंगररांगामधून शोध घेतलेल्या पर्यटक आणि फोटोग्राफरचे नाव आहे. राजगड पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आर्वी (ता. हवेली) येथील जंगलातील उंच डोंगररांगामधील एका ठिकाणी दोघेही आढळून आले. बेशुद्ध पडलेल्या अभिषेक जैन याला उपचारासाठी खेडशिवापूर येथील श्लोक रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
ठाणे अमलदार दिनेश गुंडगे यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेले देसाई आणि जैन शुक्रवारी (दि.४) सकाळी आठ वाजता कात्रज डोंगर ते सिंहगड किल्ला असा 18 किलोमीटर डोंगररांगामध्ये ट्रेकिंग करायला सुरुवात केली होती. दुपारच्या सुमारास फोटोग्राफर अभिषेक जैन यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला होता. यामुळे सोबत असलेले देसाई प्रचंड घाबरले होते. तसेच नवखे असल्याने आपण नेमके कोठे आहोत समजत नव्हते.
एनआरआय देसाई यांनी फोटोग्राफरचा पुण्यातील मित्र आकाश बागुल यांनी फोनवरून या घटनेबाबत कळविले. त्यानंतर बागुल याने डायल 112 ला कळविले. शोध घेत असताना मोबाईल लोकेशनमध्ये अडथळा येत असल्याने पोलीस आणि पर्यटक यांनी एकमेकांना शिट्ट्या वाजवून शोध मोहीम यशस्वी राबविली.
त्यानुसार राजगड ठाण्याचे राजगड पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तातडीने सूत्र हलवून शोध मोहीम हाती घेतली. उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार अजित माने, महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम, हवालदार राहुल कोल्हे, हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार विलास प्रधान, नाईक अशोक तारू यांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने जवळपास सात ते आठ किलोमीटर पायपीट करून भरकटलेल्या पर्यटकांचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.
बेशुद्ध पडलेल्या अभिषेक जैन याला तरुणाच्या मदतीने उचलून पुन्हा सात ते आठ किलोमीटर उचलून खाली पायथ्याला आणले. या कामगिरी बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि परदेशी पर्यटकांनी अभिनंदन केले आहे.