

सासवड : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भूसंपादन अधिकाऱ्यांची मनमानी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभेचे अधिवेशन सुरु होण्याची दाट शक्यता असून, यामध्ये विमानतळाचा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. अनेक आमदारांकडून भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न उपस्थित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव अशा सात गावांतील सुमारे तीन हजार एकर क्षेत्र विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत असून प्रस्तावित आरोसिटीसाठी आणखी ६२५ एकर क्षेत्राचे संपादन करण्यात येणार आहे. यातील तीन हजार एकर पैकी जवळपास ९५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्राची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक मोबदला दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच अनेकवेळा सांगितले आहे. तसेच उर्वरित क्षेत्राचे वाटप करून आगामी नवीन वर्षात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे एकीकडे भूसंपादन प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचवेळी भूसंपादन प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांची मनमानी सुरु असल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी जाहीर तक्रारी केल्या आहेत. वनपुरी, उदाचीवाडी आणि कुंभारवळण या गावांची भूसंपादन प्रक्रिया जिल्ह्याचे संपादन अधिकारी कल्याण पांढरे यांच्याकडे असून खानवडी, एखतपूर, मुंजवडी या गावांची जबाबदारी पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे आहे. या दोन्हीही अधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अनेक शेतकऱ्यांचे कौटुंबिक वाद असल्याने जमिनीच्या वाटपाबाबत वेगवेगळ्या स्तरावरील न्यायालयात खटले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मात्र असे असतानाही आर्थिक हितसंबंधातून ठराविक लोकांना पैशांचे परस्पर वाटप केले आहे. त्यामुळे त्याच क्षेत्रातील इतर हिस्सेदारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी केसेस सुरु असल्याने आमचे वाटप करण्यात येऊ नये अशा लेखी स्वरुपात तक्रारी केल्या असतानाही तक्रारदारांच्या परस्पर पैशांचे वाटप करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांची मनमानी थांबेना
शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांची मनमानी थांबत नसल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ पुरंदर कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष संभाजी जगताप यांनी प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले आहे. तसेच आरपीआयचे विष्णूदादा भोसले, बळीराम सोनावणे, ग्राहक मंचाचे महेश राऊत यांनीही वेळोवेळा निवेदने देऊन निषेध नोंदविला आहे. मात्र, अधिकाऱ्यांवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात जिल्हाधिकारी हतबल?
पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे यांच्या विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे शेतकऱ्यांनी भेटून निवेदने दिली आहेत. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. मात्र एवढ्या तक्रारी असतानाही जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. एवढेच नाही तर त्यांच्यावर कोणतेही वक्तव्य करताना मौन बाळगत असल्याने जिल्हाधिकारी हतबल झाले आहेत काय? असे प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.