म्हाडाने दिली मुदतवाढ (फोटो- ai gemini)
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
आता २२ ऑक्टोबरपर्यंत मिळाली अर्ज करण्याची संधी
आतापर्यंत एकूण १ लाख ६५ हजार २८ अर्जदारांनी केली नोंदणी
Mhada Pune: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गतच्या सदनिकांसाठी (फ्लॅट्स) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता (Pune) इच्छुक अर्जदारांना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) आणि उत्पन्न दाखल्यांच्या ऑनलाईन पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हाडातर्फे या दोन्ही योजनांसाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. आतापर्यंत एकूण १ लाख ६५ हजार २८ अर्जदारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख १ हजार ८११ अर्जदारांनी अनामत रक्कम (EMD) देखील जमा केली आहे.
Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…
अर्ज प्रक्रियेअंतर्गत अर्जदारांना ‘IHLMS 2.0’ प्रणालीवर डोमासाईल प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि आयकर विवरणपत्र (ITR) ऑनलाईन अपलोड करावे लागते. डोमासाईल आणि उत्पन्न दाखल्यांची पडताळणी ‘MahaIT’ प्रणालीद्वारे, तर आयकर विवरणपत्राची पडताळणी आयकर विभागाद्वारे ऑनलाईन केली जाते.
या प्रक्रियेत अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने म्हाडाने यापूर्वी अर्जाची अंतिम मुदत वाढवून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली होती. मात्र, MahaIT प्रणालीद्वारे प्रमाणपत्रांच्या पडताळणीत येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज अजूनही प्रलंबित आहेत.
म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ३,८७२ डोमासाईल प्रमाणपत्रे आणि ९,१४२ उत्पन्न दाखल्यांची पडताळणी बाकी आहे. अशा प्रकारे एकूण १३,०१४ प्रमाणपत्रांची तपासणी प्रलंबित आहे. ही परिस्थिती लक्षात घेता अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
Mhada चा मोठा निर्णय
म्हाडातर्फे बांधकाम व विकास करार अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्पातील निष्कासित १,२०० निवासी सदनिकाधारकांना दरमहा २० हजार रुपये, तर पात्र ठरलेल्या १२१ अनिवासी गाळेधारक व झोपडीधारकांना दरमहा १० हजार रुपये भाडे दि. ०१ नोव्हेंबर २०२६ पासून देण्यात येणार असून १९६ सशर्त पात्र धारकांनाही पुढील सहा महिन्यांचे भाडे अदा करण्यात येणार असल्याचे , आज म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज सांगितले.






