सौजन्य - नवराष्ट्र टीम
चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढती अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि ड्रेनेजच्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ठोस उपाययोजनांची मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवावीत आणि त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून लगेच रस्ता, ड्रेनेज किंवा आवश्यक पायाभूत सुविधांची कामे सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
चाकण परिसरातील वाहतूक व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय समितीची विशेष बैठक पार पडली. यावेळी आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
३१ ऑगस्टपर्यंत तातडीची कामे पूर्ण करा
चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यांच्या साईडपट्ट्या दुरुस्त करणे, साचलेला गाळ व कचरा हटविणे ही अत्यावश्यक कामे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. १ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील विकासकामांना गती देता यावी, यासाठी तातडीच्या कामांचा स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
रस्त्यांच्या कामांसाठी २४ तास वाहतूक वळवणार
रस्त्याचे काम सुरू असताना चालू वाहतुकीमुळे कामाचा दर्जा आणि वेग बाधित होतो. त्यामुळे योग्य पूर्वनियोजन करून आवश्यकतेनुसार २४ तास पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवून रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. काम पूर्ण होताच रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी खुला करावा आणि पीएमआरडीए व इतर यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. चाकणमधील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपलब्ध अधिकृत जागांचा नकाशा तयार करून तो उद्योजक, चालक आणि वाहतूकदारांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. ट्रान्सपोर्ट विभाग व ट्रान्सपोर्ट असोसिएशनसोबत बैठक घेऊन मालवाहू वाहने, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहनांच्या हालचालींचा अभ्यास करून एकात्मिक वाहतूक आराखड्यात त्याचा समावेश केला जाईल.
अतिक्रमणे हटवून जागांचा तत्काळ विकास
केवळ अतिक्रमणे हटवून न थांबता, त्या मोकळ्या झालेल्या जागांवर पुन्हा कब्जा होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या ठिकाणी लगेच पदपथ, रस्ता रुंदीकरण अथवा ड्रेनेजची कामे हाती घेण्यात येतील. नैसर्गिक नाले आणि ड्रेनेजमधील अडथळे एका महिन्याच्या आत दूर करण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. चाकण परिसरातील सर्व रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेचे सर्वंकष तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात वारंवार रस्ते खोदावे लागू नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित नियोजन करावे, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीत स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर कालबद्ध कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.






