traffic police
पिंपरी : विनाहेल्मेट दुचाकी चालविणे शहरातील नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. गेल्या वर्षात पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर केली आहे. गेल्या वर्षभरात ८५ हजार दुचाकीस्वारांवर विनाहेल्मेट कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ कोटी २५ लाख ४७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बेशिस्त वाहनचालकांवर ई – चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही काही वाहनचालक त्याला जुमानत नसून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. तसेच अपघाताचेही प्रकार सातत्याने घडत आहेत. अशा बेशिस्तांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
पोलिसांनी गेल्या वर्षी विनाहेलेम्ट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उभारत सव्वाचार कोटी दंड वसूल केला आहे. त्यानंतर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत २ कोटी ६८ लाख ८१ हजार रुपायांचा दंड वसूल केला आहे.
याबरोबरच पोलिस आदेश नाकारणे, अनधिकृत वाहनचालक, विनालायसन्स , लायसन्सचा कार्यकाल संपल्यानंतरही वाहन चालविणे, विनाकारण हॉर्न, विनाविमा वाहन, वेगमर्यादा उल्लंघन, ट्रिपलसिट, नंबर प्लेट छेडछाड, सायलेन्सर, आरसे नसणे, बेल्ट न लावणे, काळ्या काचा, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सिग्नल जम्पिंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे, मोबाईल टॉकिंग, वाहन मॉडिफाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी शहरात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून वर्षभरात ७ लाख ३० हजार २८५ खटले दाखल केले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ३१ कोटी ४४ लाख ९३ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे म्हणाले, बेशिस्त वाहनचालकांमुळे त्यांच्या स्वत:सह इतरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहणार असून, दंड वसुलीवर भर देण्यात येत आहे.
वर्षभरात वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
कारवाई – खटले – दंड (रुपये)
१) पोलिस आदेश नाकारणे : १७८६ : ३८०३००
२) अनधिकृत वाहनचालक : १८ : २००००
३) विनालायसन्स : २९३११ : १५६०५०००
४) मुदतबाह्य लायसन्स : २६१९ : १३६८०००
५) विनाकारण हॉर्न वाजविणे : ३३० : १६५०००
६) विनाविमा वाहन चालविणे : ४२५४ : ४६०१४००
७) वेगमर्यादा उल्लंघन : २६१६७ : २६८८१०००
८) ट्रिपलसिट : २०९९० : ४१९८०००
९) विना हेल्मेट : ८५०९४ : ४२५४७०००
१०) नंबर प्लेट छेडछाड : ६४८ : ५४७४००
११) सायलेन्सर : २४७८ : २४७५६००
१२) आरसे नसणे : ५४४५७ : ११२००६००
१३) सिटबेल्ट न लावणे : ४६३६६ : ९४१३६००
१४) काळ्या काचा : ३९९८८ : ८५३९९००
१५) विरुद्ध दिशेने वाहन चालविणे : ४०५०७ : ४०५०७०००
१६) सिग्नल जम्पिंग : ५३५१७ : ११३११३००
१७) झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे : ६६४९ : १३२९८००
१८) मोबाईल टॉकिंग : २२३०७ : ४४६१४००
१९) वाहन मॉडिफाय करणे : २५०७ : २५०७०००