

उमटे धरणाची पाणी साठवण क्षमता गाळामुळे मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा
१३ प्रमुख कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन
जिल्हा परिषदेकडे गाळ काढण्यासाठी निधी नसल्याचे स्पष्ट
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील ४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांची तहान भागवणाऱ्या उमटे धरणाची पाणी साठवण क्षमता गाळामुळे मोठ्या प्रमाणात घटल्याचा दावा उमटे धरण संघर्ष ग्रुपने केला आहे. १९७८ मध्ये उभारण्यात आलेल्या या धरणाची मूळ ८७ दशलक्ष घनफूट क्षमता आता केवळ ३० दशलक्ष घनफूटपर्यंत घसरल्याचे ग्रुपचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना गाळ काढण्यासाठी जि.प. कडे निधी नसल्याचे सांगितले असल्याने, संघर्ष ग्रुपने १३ औद्योगिक कंपन्यांकडे सीएसआर व सीईआर निधीतून आर्थिक मदत आणि यंत्रसामग्रीची मागणी केली.
उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष ॲड. राकेश नारायण पाटील यांनी १६ नोव्हेंबर रोजी १३ प्रमुख कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन पाठवले आहे. यामध्ये जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज (नागोठणे व पाताळगंगा), सुदर्शन केमिकल, गेल इंडिया, आरसीएफ, ओएनजीसी, जेएनपीए, इनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, टाटा पॉवर, थर्मक्स, महाजेनको आणि पीएनपी यांचा समावेश आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून गाळ काढण्यास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
उमटे धरणाचा प्रश्न केवळ गाळाचा नसून, पिण्याच्या पाण्याच्या हक्काचा आहे. उद्योगांची आर्थिक उलाढाल होत असताना स्थानिकांच्या पाणीप्रश्नासाठीही कपन्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी. १३ औद्योगिक कंपन्यांनी सीएसआर निधीतून धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घ्यावा. - ॲड. राकेश पाटील, अध्यक्ष, उमटे धरण संघर्ष ग्रुप
सुडकोली, रामराज, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, रेवदंडा, चौल-वरंडे, नागाव आणि आक्षी आदी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह ३३ आदिवासी वाड्यांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. धरणाची मालकी रायगड जिल्हा परिषदेकडे आणि देखभालीची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे असली, तरी गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभेत स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गाळाचे तांत्रिक सर्वेक्षण, निधीचा आराखडा आणि कालबद्ध नियोजनाची मागणी जोर धरत आहे.
पाणीटंचाईची भीतीः गाळ साचल्याने क्षमता घटल्याचा दावा, उन्हाळ्यात ४७ गावे व ३३ आदिवासीवाड्यांना फटका बसण्याची शक्यता.
निधीची अडचणः जिल्हा परिषदेकडे गाळ काढण्यासाठी निधी नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
उद्योगांकडे अपेक्षा: सीएसआर व सीईआर निधीतून अर्थसहाय्य, यंत्रसामग्री व प्रत्यक्ष पाहणी, पुनरुज्जीवन करण्याची मागणी.