कोकणच्या कृषी व पशुसंवर्धन परंपरेला बळ देणाऱ्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव अंतर्गत वाशिष्ठी डेअरी पशुधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चिपळूण : कोकणच्या कृषी व पशुसंवर्धन परंपरेला बळ देणाऱ्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव अंतर्गत वाशिष्ठी डेअरी पशुधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व पशुपालकांच्या कष्टांचे चीज करणारी आणि उत्कृष्ट पशुधनाचा सन्मान करणारी ही स्पर्धा कोकणातील पशुसंवर्धन चळवळीला नवे बळ देणारी ठरणार आहे. 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता आणि सकाळी 10 वाजता प्रदर्शनाच्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, बहादूरशेख नाका, चिपळूण येथे विविध प्रकारांमध्ये स्पर्धांची रंगत पाहता येणार आहे. ‘महोत्सव कोकणाचा, कृषी समृद्धीचा’ या संकल्पनेतून शेतकरी व पशुपालकांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
वाशिष्ठी कृषी महोत्सवाचे हे सलग तिसरे वर्ष असून, कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, तंत्रज्ञानाची माहिती, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि मनोरंजन यांचा संगम असलेला हा महोत्सव संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून या महोत्सवाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
6 जानेवारी रोजी सकाळी ठिक 8 वाजता सर्वांत जास्त दूध देणारी म्हैस आणि सर्वांत जास्त दूध देणारी गाय ही स्पर्धा होईल. सकाळी १० वाजता सुदृढ, निरोगी, सुंदर म्हैस, सुदृढ, निरोगी, सुंदर गाय, सुदृढ, निरोगी, सुंदर बैल, सुदृढ, निरोगी, सुंदर रेडकू, सुदृढ, निरोगी, सुंदर म्हैस वासरू, सुदृढ, निरोगी, सुंदर गाय वासरू या प्रकारांत स्पर्धा होईल. तसेच याशिवाय सकाळी 10 वाजता देशी/संकरित वासरू मेळावा व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये रोख तसेच शिल्ड व सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकास 7 हजार रुपये रोख तसेच शिल्ड व सन्मानपत्र आणि तृतीय क्रमांकास 5 हजार रुपये रोख तसेच शिल्ड व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा जिल्हास्तरासाठी मर्यादित राहील. सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाय व म्हैस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता प्रदर्शनस्थळी पशुधन घेऊन उपस्थित राहावे. पंचांच्या समोर जनावरांचे दूध काढून मोजल्यानंतर अंतिम निर्णय दिला जाईल. तसेच सुदृढ, निरोगी, सुंदर गाय व म्हैस वासरांसाठी वय मर्यादा 9 वर्षे असून, संबंधित पशुधन घेऊन स्पर्धकांनी 6 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रदर्शनस्थळी हजर करणे आवश्यक आहे. पंचांच्या समोर पाहणी झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
इच्छुक स्पर्धकांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी 9422661197, 9637605757, 7588330011, 9890393823
किंवा 7722045048 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोकणातील पशुपालकांचा सन्मान, गुणवत्तेचा गौरव आणि वाशिष्ठी डेअरीच्या दर्जेदार दुग्धजन्य उत्पादनांची ओळख करून देणारी ही पशुधन स्पर्धा शेतकरी-पशुपालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे. ‘गोडवा वाशिष्ठी प्रॉडक्ट्सच. प्रत्येक क्षण आनंदाच.’ या संदेशासह हा कृषी महोत्सव कोकणच्या विकासयात्रेत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
`वाशिष्ठी`चे गिफ्ट हॅम्पर जिंकण्याची सधी!
वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या ठिकाणी लकी ड्रॉ कूपन उपलब्ध करण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या समारोपावेळी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमानंतर या कूपनमधून ड्रॉ काढला जाईल आणि पहिल्या तीन भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते वाशिष्ठी डेअरीचे गिफ्ट हॅम्पर प्रदान करण्यात येईल.
Web Title: Livestock competition on january 6 livestock farmers will be honored at the vasishthi agricultural festival