ncp sharad pawar group leader Samarjit Ghatge met Manoj Jarange Patil
कागल : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. प्रचार जोरदार सुरु असून सभा देखील घेतल्या जात आहेत. या सभांमधून नेत्यांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राजकारण रंगले आहे. यंदाच्या विधानसभेमध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. जरांगे पाटील हे येत्या 3 नोव्हेंबर रोजी कोणत्या उमेदवाराला पाडायचं हे सांगणार आहे. आता त्यापूर्वी कागलचे महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच या भेटीमध्ये आपल्यावर लक्ष असावे असे देखील घाटगे यांनी सूचित केले आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना समरजीत घाटगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार गटाचे उमेदवार समरजीत घाटगे यांची लढत अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासोबत होणार आहे. या दोन्ही नेत्यांमधील लढत ही चुरशीची आणि प्रतिष्ठेची असणार आहे. अजित पवार गट व शरद पवार गटामध्ये ही थेट लढत होणार आहे. त्यामुळे समरजीत घाटगे यांनी आता भेटीगाठी वाढवल्या आहेत. घाटगे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. हसन मुश्रीफ यांच्याबाबत घाटगे यांनी जोरदार टीका देखील केली आहे.
काय म्हणाले समरजीत घाटगे?
माध्यमांशी संवाद साधताना समरजीत घाटगे म्हणाले की, “या पाच वर्षात माझ्यावर बऱ्याच टीका झाल्या. मला हरामखोर बोललं गेलं, भिकारी म्हटलं गेलं, मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना उंदीर म्हणून हिणवलं गेलं. पण या गोष्टी मी वैयक्तिक घेत नाही. प्रत्येक व्यक्ती त्याच्या विचाराप्रमाणेच बोलतो. मी आजही त्यांना आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असं संबोधत असतो. मला वाटतं आपण जेव्हा निष्ठा विकतो. सौदा करतो तेव्हा झोप येत नाही. तेव्हा अशी चुकीची विधान करत असतो. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी मी माझ्या संस्कृतीप्रमाणेच बोलणार आहे. येत्या काळात त्यांच्या चार कॉन्ट्रॅक्टरची सत्ता आहे. ती बाजूला करून परिवर्तन करायचं आहे. त्यांच्यावर टीका करताना मी माझ्यावर जे संस्कार आहेत त्याप्रमाणेच वागणार आहे,” अशा कडक शब्दांत समरजीत घाटगे यांनी टीका करुन हसन मुश्रीफ यांना टोला लगावला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवर समरजीत घाटगे यांनी मत मांडले. ते म्हणाले की, “मी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळेतून वेळ काढून मला भेट दिली. मी कागल विधानसभा मतदारसंघातून उभा आहे. त्यामुळे मला तुमचं सहकार्य करा. त्यासाठी मी आलोय, असं मी त्यांनी सांगितलं. जरांगे म्हणाले की, शाहू महाराजांचंही घराणं आहे. त्यांचाही मान राखला पाहिजे. त्यावर मी त्यांना फक्त तुमचं लक्ष असू द्या, अशी विनंती केली. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या 3 तारखेला त्यांची मिटिंग आहे. त्यात ते निर्णय घेणार आहेत,” असे मत समरजित घाटगे यांनी स्पष्टपणे मांडले.